युती दुभंगली, आघाडीसाठी बैठकीच्या फैरी सुरूच
By admin | Published: January 29, 2017 03:03 AM2017-01-29T03:03:49+5:302017-01-29T03:05:12+5:30
बुलडाणा जि.प निवडणुकीसाठी कांँग्रेस - राष्ट्रवादी सकारात्मक , मात्र निर्णय नाही.
बुलडाणा, दि. २८- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे जिल्हय़ातील युतीही दुभंगली असून, आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीकडे सवार्ंचे लक्ष लागले आहे. विजय किंवा पराभवाची चिंता न करता शिवसेना स्वतंत्र निवडणूक लढणार असून, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकांच्या फैरी सुरू आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना व भाजप दोन्ही पक्ष युती करण्यासाठी सकारात्मक होते. याबाबत कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी भाऊसाहेब फुंडकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्यामध्ये दोन बैठकाही झाल्या होत्या. यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपतराव सावळे यांनी नगर पालिकांप्रमाणेच स्थानिक पातळीवर युती करण्याचा निर्णय घेऊन युतीचे अधिकारी स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले होते. नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेना व भाजपने काही ठिकाणी युती केली होती, तर काही ठिकाणी स्वतंत्र निवडणुका लढविल्या होत्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेतही करणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले होते; मात्र मुंबई महानगरपालिकेतील जागा वाटपावरून शिवसेना व भाजपची युती तुटली. राज्यभरातील कोणत्याही निवडणुकीत भाजपशी युती करू नका, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्यामुळे शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी जिल्हा परिषद स्वतंत्र लढविणार असल्याचे ठरविले आहे. निवडणुकीत परिणाम कोणतेही निघाले, तरी स्वतंत्रच लढणार असल्याचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगितले. मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीनंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकरला बैठक घेऊन यावेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय प्रलंबित आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने काही नगरपालिकेत एकत्र तर काही नगरपालिकेत स्वतंत्र निवडणूक लढविली होती. आता जिल्हा परिषदेत युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे व आ. राहुल बोंद्रे यांच्यामध्ये बैठक पार पडली; मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करायची असली तरी बंडखोरी टाळण्याकरिता अखेरच्या क्षणी आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.