राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत शेतकऱ्यांना शेतीपूरक घटकांचे वाटप
By Admin | Published: July 12, 2017 07:22 PM2017-07-12T19:22:25+5:302017-07-12T19:22:25+5:30
सामुहिक शेततळे, पेरू घन लागवड, प्लास्टीक आच्छादन व फिरते प्रक्रिया युनीटचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा- जिल्ह्यामध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना शेतीपूरक घटकांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये सामुहिक शेततळे, पेरू घन लागवड, प्लास्टीक आच्छादन, फिरते प्रक्रिया युनिट आदी घटकांचा समावेश आहे.
शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जावून तेथून अर्ज भरण्यास मदत मिळवावी. इच्छूक शेतकरी बांधवांनी अर्ज केल्यानंतर उपविभागीय कृषि अधिकारी हे प्राप्त अर्जांमधून लॉटरी पद्धतीने तालुका निहाय शेतकऱ्यांनी निवड करतील व निवड केलेल्या लाभार्थ्यांच्या अर्जांना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय पूर्वसंमती देईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकरी बांधवांनी 7/12 उतारा, नमुना 8-अ उतारा, आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, एक फोटो व मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रे सोबत आवश्यक आहेत. इच्छूक लाभार्थ्यांनी आपल्या गावातील कृषि सहायक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.