मृत व्यक्तींच्या वारसास २४ तासाच्या आत अनुदानाचे वाटप
By Admin | Published: October 4, 2016 01:57 AM2016-10-04T01:57:21+5:302016-10-04T01:57:21+5:30
पुरग्रस्तांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली.
बुलडाणा, दि. ३- पळसखेड नागो शिवारात असलेल्या पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात १ ऑक्टोबर रोजी सुरेश खरे व जमीलखान दुल्हेखान हे दोन-दोन युवक वाहून गेले होते. या बेपत्ता युवकांचा महसूल प्रशासनाने शोध घेतला असता, या युवकांचे मृतदेह २ ऑक्टोबर रोजी सकाळी आढळून आले. या मृत व्यक्तींच्या वारसांना २४ तासांच्या आत प्रत्येकी चार लाख रुपये अनुदान धनादेशाचे वाटप आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ३ ऑक्टोबर रोजी आपादग्रस्तांच्या घरी जावून केले.
तालुक्यातील पळसखेड नागो शिवारातील पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात १ ऑक्टोबर रोजी सुरेश खरे व जमीलखान दुल्हेखान हे युवक वाहून गेले होते. या दोन्ही युवकांचे मृतदेह २ ऑक्टोबर रोजी सकाळी आढळून आले. यावेळी पंचनामा करून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयातील त्यांच्यावर अवलंबून असलेले सदस्य, पत्नी, मुले यांचा आधार हरवला होता. याबाबत नैसर्गिक आपत्तीमध्ये असलेल्या १३ मे २0१५ च्या शासननिर्णयानुसार तहसीलदार दीपक बाजड यांनी सदर नैसर्गिक आपादग्रस्तांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये सहायक अनुदान २४ तासांच्या आत मंजूर केले., तसेच आपादग्रस्तांच्या कुटुंबीयांना त्यांच्या घरी जावून आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याहस्ते ३ ऑक्टोबर रोजी देण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब तिडके, तहसीलदार दीपक बाजड, मंडळ अधिकारी गिरी, मिसाळ, तलाठी देशमुख, हिंगे, कोळसे, सावळे आदी उपस्थित होते.