दूध डेअरीमधून दूध विकण्यास परवानगी द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:04+5:302021-05-13T04:35:04+5:30
चिखली : जिल्ह्यात १० मे रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये दूध वितरण केंद्रांना ...
चिखली : जिल्ह्यात १० मे रोजीच्या रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामध्ये दूध वितरण केंद्रांना परवानगी न दिल्याने दूध उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे दूध डेअरी धारकांना सकाळी ६ ते १० व सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूध संकलन व वितरणासाठी मुभा द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रविकांत तुपकर यांनी १२ मे रोजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये दूध उत्पादक व संकलन केंद्रांना सकाळी ६ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ अशी वेळ ठरवून देण्यात आली असून, घरपोच दूध वितरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दूध उत्पादक ते ग्राहक असे घरपोच वितरण फार कमी प्रमाणात होते. अधिक प्रमाणात वितरण हे दूध डेअरीमधूनच होते. दुसरीकडे दूध डेअरी चालकांकडे यंत्रणा नसल्याने ते घरपोच वितरण करू शकत नाही. त्यामुळे सकाळी व सायंकाळी संकलन झालेल्या दुधाचे वितरण होणार नसल्याने हजारो लिटर दूध वाया जाऊ शकते. दूध उत्पादकांना साठवणुकीची अडचण तसेच गायी, म्हशीच्या कासेमध्ये फार काळ दूध ठेवू शकत नाही. दूध हे जीवनावश्यक आहे. लहान मुले, गरोदर माता व रुग्णांना दुधाची गरज आहे. त्यामुळे दूध डेअरीला लॉकडाऊनमध्ये मुभा देणे गरजेचे आहे. दूध संकलन केंद्र व दूध डेअरी यांना सकाळी ६ ते १० व सायंकाळी ५ ते रात्री आठ या वेळेत दूध विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी रविकांत तूपकर यांनी यावेळी केली. दरम्यान, चर्चेअंती सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहे.