कोरोनाबरोबरच डेंग्यूचाही धोका वाढला, जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:03 PM2020-10-19T12:03:16+5:302020-10-19T12:03:29+5:30
१ जानेवारी ते ५ ऑक्टाेबर दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबरोबरच डेंग्यूचोही धोका वाढला आहे. १ जानेवारी ते ५ ऑक्टाेबर दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले आहे. तसेच १८६ डेंग्यू सदृश्य रुग्ण असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण यांनी सांगितले. लोणार तालुक्यात सर्वाधिक ९ रुग्ण आढळले आहेत तर मलेरीयाचे जिल्ह्यात तीन रुग्ण आढळल्याचे चित्र आहे. जिल्हा हिवताप विभागाने राबविलेल्या नियोजबद्ध मोहिमेमुळे डेंग्यू रुग्णांची संख्या नियंत्रणात राहील्याचे चित्र आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात तातडीने सर्वे करण्यात येत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यासोबतच डेंग्यूचेही रुग्ण वाढले होते. मात्र, जिल्हा हिवताप विभागाच्या वतीने राबवलेल्या मोहिमेमुळे डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात काही प्रमाणात यश आले आहे. सध्या जिल्ह्यात १ जानेवारी ते ५ आॅक्टोबर बुलडाणा आणि चिखली तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. जळगाव जामोद तालुक्यात दोन तर संग्रामपूर, नांदुरा तालुक्यातील दोन, मोताळा तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे.
डेग्युमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. लोणारमधील देउळगाव कुंडपाळ येथे चार, वडगाव तेजन २, भुमराळा १ आणि बिबी येथे दोन रुग्ण आढळले आहेत. मलेरीयाचे जिल्ह्यात तीन रुग्ण असून यामध्ये जामोद तालुक्यातील खेर्डा बु, बुलडाणा तालुक्यातील केसापूर आणि चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
हत्तीरोगाचे २८ रुग्ण
जिल्ह्यात हत्तीरोगाचे २८ रुग्ण आढळले आहे. बुलडाणा शहरात एक,दुधा येथील एक, मनसगाव, आळसणा, डोलारखेड येथील प्रत्येकी एक, पिंपळगाव राजा व खामगाव येथील एक आणि सुटाळा बु येथील पाच , टुनकी ,सोनाळा, संग्रामपूर, पळशी येथील प्रत्येकी एक, पिंप्री गवळी येथील एक, दसरखेड व वरखेड येथील प्रत्येकी एक, मलकापूर येथील येथील दोन, मेहकर, जानेफळ, डोणगाव व वरखंड येथील प्रत्येकी एक आणि गुंधा,गुंजखेड, अंजनी खुर्द येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
आठड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. तसेच प्रत्येक रविवार आपल्या कुटुंब आणि घरासाठी द्या. या दिवशी घर व परिसरातील डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करून डेंग्यूपासून बचाव करा.
- शिवराज चव्हाण,
जिल्हा हिवताप अधिकारी, बुलडाणा