साथरोग वाढले
By Admin | Published: July 24, 2014 11:55 PM2014-07-24T23:55:39+5:302014-07-24T23:55:39+5:30
रुग्णालये हाऊसफुल्ल : ढगाळ वातावरणाचा परिणाम
मेहकर : गत तीन ते चार दिवसांपासून रिमझिम पावसामुळे सर्वत्र दमट व ओलसर वातावरण निर्माण झाले असून, या वातावरणामुळे बुरशीजन्य व साथीच्या आजाराला उभारी मिळत आहे. त्यामध्ये डायरिया व टायफाईडचे सर्वाधिक रुग्ण असून, शासकीय तसेच खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झालेली दिसून येत आहेत. दरम्यान, या ढगाळ वातावरणामुळे दम्याच्या आजारानेही डोके वर काढले आहे. पावसाळ्यापूर्वी गोवोगावी स्वच्छता अभियानाचे विविध उपक्रम राबविण्यात येतात; परंतु अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याने घाणीचे साम्राज्य गावोगावी पाहायला मिळत आहे. यामुळे विविध डासांची उत्पत्ती होत आहे. वाढती अस्वच्छता, मच्छरांचा उच्छाद व रिमझिम पाऊस अशा वातावरणामुळे साथीच्या आजाराने डोकेवर काढण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या साथी प्रामुख्याने आढळतात. पावसाळ्यात पाण्याचे स्त्रोत दूषित होतात व त्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, विषाणूजन्य काविळ, विषमज्वर आदी आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने लेप्टोस्पॉयसिस आजारही उद्भवतात. शासकीय तसेच खासगी रुग्यालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये डायरिया व टायफाईडचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे आढळुन आले आहे. हिवाळ्यात व्हायरल इन्फेक्शनने डोके वर काढले होते. त्यामुळे शहर तसेच ग्रामीण भागात याचे अनेक रुग्ण बळी ठरले होते. आता पावसाळ्यात पुन्हा साथीच्या आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच साथीच्या आजाराने ग्रासले आहे. सद्यस्थितीत वातावरणातील अचानक झालेल्या दमट बदलाचा परिणाम म्हणून सर्दी, खोकला व ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. साथीच्या आजाराचे प्रत्येक घराघरात रुग्ण आढळून येत आहेत. त्यात बदलते वातावरण काळाचा घालाच. ढगाळ वातावरणामुळे दम्याचा विकार बळावत असून, यामध्ये वृद्धांसह लहान मुलांचाही समावेश असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.