आंबेवाडी, हिवरा गडलिंग ग्राम पंचायत अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:56+5:302021-01-03T04:34:56+5:30
आंबेवाडी ग्राम पंचायत निवडणुकीत नेहमीच कलहांचे वातावरण निर्माण होत होते. प्रकरण हातघाईवर येऊन हाणामारीपर्यंत जात होते. एका निवडणुकीत ४० ...
आंबेवाडी ग्राम पंचायत निवडणुकीत नेहमीच कलहांचे वातावरण निर्माण होत होते. प्रकरण हातघाईवर येऊन हाणामारीपर्यंत जात होते. एका निवडणुकीत ४० ते ५० व्यक्तींवर गुन्हेदेखील दाखल होऊन अनेकांना अटक झाली होती. गावात दोन गट निर्माण होऊन आपले बस्तान बसवित होते. ही बाब लक्षात घेऊन आंबेवाडी येथील माजी पोलीस पाटील शिवाजी बोंद्रे आणि शंकर जायभाये या दोन गटातील नेत्यांना पंचायत समिती सदस्य बद्री बोडखे यांनी एकत्रित बसवून ग्राम पंचायत अविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही गटातील नेत्यांची समेट घडवून ग्रामस्थांच्या बैठकीत सात सदस्यांची नावे जाहीर केली. त्या सात उमेदवारांनीच तहसील कार्यालयात जावून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. ३० डिसेंबर रोजी वार्ड क्रमांक एकमधून जगदिश डिगांबर राठोड, अनसूया सीताराम जायभाये, संगीता जालींधर जाधव, वार्ड क्रमांक दोनमध्ये रवींद्र अंबादास बोंद्रे, सीमा संजय डोईफोडे, वार्ड क्रमांक तीनमध्ये स्वाती समाधान सांगळे, सुनीता शिवाजी शिनगारे हे सातच अर्ज निवडणुकीसाठी दाखल झाल्याने सातही सदस्य अविरोध निवडून आले आहेत.
हिवरा गडलिंग ग्राम पंचायतही अविरोध
हिवरा गडलिंग ग्राम पंचायतीचीही स्थापनेपासून आतापर्यंत कधीच अविरोध निवडणूक झाली नव्हती. यावेळी ग्रामस्थांच्या सहमतीने वार्ड क्रमांक एकमधून संध्या देवीदास मानतकर, परमेश्वर झामसिंग चव्हाण, शालीनी राठोड, वार्ड क्रमांक दोनमधून पुनम अनंता खरात, रेणुका रवींद्र खरात, वार्ड क्रमांक तीनमधून अविनाश दिलीप गवई आणि तुळशिराम भगवान मानतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सात सदस्यांसाठी सातच अर्ज दाखल केल्याने सर्व सदस्य अविरोध निवडून आले. ग्रामस्थांच्या एकीमुळे हा अविरोध निवडीचा कार्यक्रम पार पडला. तांत्रिकदृष्ट्या या दोन्ही ग्रामपंचायती अविरोध झाल्याची घोषणा अद्याप बाकी आहे.