बुलडाणा जिल्ह्यातील अंभोडा नदीमध्ये ‘सुजलाम सुफलाम’ अंतर्गत काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 03:27 PM2018-05-02T15:27:56+5:302018-05-02T15:27:56+5:30
बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ प्रकल्पांतर्गत बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारला उत्साहात करण्यात आला.
बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या ‘सुजलाम सुफलाम’ प्रकल्पांतर्गत बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारला उत्साहात करण्यात आला. सहकार क्षेत्रात जिल्ह्यातील अग्रणी असलेल्या बुलडाणा अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को आॅप सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते मशीन्सचे पूजन करण्यात आले.
बुलडाणा तालुक्यातील या सुमारे ४.५० किलोमीटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण व सरळीकरण करण्यात यावे, यासाठी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सातत्याने जिल्हा प्रशासन व बीजेएसकडे मागणी केली होती. गावकºयांच्या मागणीनुसार या कामाला जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर कामाला मंगळवारी प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या पार्श्वभूमीवर या कामाला सुरुवात झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. या कामावर बीजेएसच्या वतीने आलेल्या मशीन आॅपरेटर व हेल्पर्स यांच्या राहण्या व खाण्याची व्यवस्था गावकºयांच्या वतीने करण्यात येणार आहे. बुलडाणा तालुक्यातील अंभोडा नदी परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला बीजेएसचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, अॅड. जितेंद्र कोठारी, नितीन सावजी, पंजाबराव, मिलिंद व स्थानिक नागरिक उपस्थित होते.