रुग्णवाहिका दीड महिन्यापासून नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:05+5:302021-06-01T04:26:05+5:30
शेतकरी पीक विम्यापासून वंचित अमडापूर : अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी ...
शेतकरी पीक विम्यापासून वंचित
अमडापूर : अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक विमा काढला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. शासनाने नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर मागील पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
बुलडाणा शहरात वाहतूक कोंडी
बुलडाणा : शहरातील आठवडी बाजार परिसरात सोमवारी वाहतुकीची कोंडी झाली होती. परवाना नसलेल्या तसेच अल्पवयीन मुलांच्याही दुचाकी सुसाट धावतात. शहरातील बेलगाम वाहतुकीकडे वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे. रस्तेही गर्दीने गजबजलेले दिसून येतात. त्यामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे.
स्वच्छतागृहाची झाली दुरवस्था
बुलडाणा : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने अस्वच्छता वाढली आहे. शासकीय कार्यालयांमध्येही अनेक शौचालये निरूपयोगी ठरत आहेत. काही अधिकारी, कर्मचारीसुद्धा बाहेरच जात असल्याचे दिसून येते.
सिकलसेल आजार; जनजागृतीला फटका
मेहकर : आरोग्य विभामार्फत सिकलसेल आजार नियंत्रणनिमित्त आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा आदी ठिकाणी सिकलसेल आजारानिमित्त माहिती व उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात येते. परंतु कोरोना संसर्गामुळे सिकलसेल आजार नियंत्रणाच्या जनजागृतीला फटका बसला आहे.
जलस्रोत खालावले
बुलडाणा : जिल्ह्याची संभाव्य पाणीटंचाईची स्थिती गृहीत धरता ३२ दलघमी पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आलेले होते. त्यामुळे बाष्पीभवन वगळता बुलडाणा जिल्ह्यात ४४१ दलघमी पाणीसाठा प्रकल्पांमध्ये उपलब्ध असताना हे पाणी आरक्षित करण्यात आले होते. दरम्यान, आता जलस्रोत खालावल्याचे दिसून येत आहे.
लाेणार शहरात पार्किंग झोनचा अभाव
लाेणार : शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. शहरात वाहन पार्किंग झोन उभारण्याची मागणी होत आहे. सराेवर राेडवर नेहमी वाहने अस्ताव्यस्त उभी केलेली दिसून येतात.
पपई, मोसंबी फळांची विक्री वाढली
धामणगाव बढे : मोसंबी, पपईची विक्री वाढली आहे. परंतु कॅल्शिअम कार्बाईडने फळे कृत्रिमरित्या पिकवली जात आहेत. ही कृत्रिमरित्या पिकविलेली फळे खाल्ल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. सध्या पपईसह विविध फळे कृत्रिमरित्या पिकवली जातात.
स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन
सिंदखेड राजा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानात नियमांचे उल्लंघन होत आहे. परिसरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याची जादा दराने विक्री करण्यात येते. त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पानटपऱ्यांवर होणारी पेट्रोल विक्री थांबली
डोणगाव : येथून जाणाऱ्या महामार्गावर बऱ्याच ठिकणी पेट्रोलची खुलेआम अवैध विक्री करण्यात येत होती. अवैध पेट्रोल विक्री थांबविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. बॉटलमध्ये हे पेट्रोल दिले जात होते. परंतु आता पेट्रोलचे भाव शंभरी पार गेल्याने पानटपऱ्यांवर होणारी पेट्रोल विक्रीही थांबली आहे.
बुलडाणा तालुक्यात २८ पॉझिटिव्ह
बुलडाणा : तालुक्यात सोमवारी २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याचे दिलासादायक चित्र सध्या दिसून येत आहे.