रुग्णवाहिकांचे दर निश्चित, अवाजवी दर आकारल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:36 AM2021-05-21T04:36:40+5:302021-05-21T04:36:40+5:30
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिकाधारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पाहता रुग्णवाहिकांचे अधिकृत ...
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिकाधारकांकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पाहता रुग्णवाहिकांचे अधिकृत दर निश्चित करण्यात आले आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून हे दर निश्चित करण्यात आलेले आहे. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या दरापेक्षा रुग्णवाहिकाधारकाने जादा दर आकारल्यास तात्काळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी किंवा या कार्यालयास ई-मेलद्वारे तक्रार नोंदवावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, रुग्णवाहिकाधारकांनी वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, दिनांक, मोबाइल क्रमांक, आकारलेले भाडे व रुग्णासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक असणे आवश्यक राहणार आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी वाहन मालकाची आहे. सोबतच रुग्णवाहिकेचे भाडे दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतील बाजूस स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने लावणे चालक व मालकास बंधनकारक आहे. निर्धारित दरापेक्षा जास्त दर आकारणी करणाऱ्या वाहन मालकावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय प्रसंगी दंडात्मक कारवाई करू शकते. सोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गतही प्रकरणात कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विनावातानुकूलित आणि वातानुकूलित अशा दोन्ही प्रकारांमध्ये हे दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.