बुलडाणा जिल्ह्यात रुग्णवाहिका पडताहेत अपुऱ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:36 AM2020-09-23T11:36:38+5:302020-09-23T11:36:57+5:30
१०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून त्यापैकी ११ रुग्णवाहिका या कोवीड संदर्भाने कार्यरत आहेत.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आॅक्टोबरमध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता पाहता जिल्ह्यात रुग्णवाहिकांच्या नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात १०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून यापैकी ११ रुग्ण वाहिका या कोवीड रुग्णांच्या वाहतुकीसाठी प्रामुख्याने वापरण्यात येत असून बहुतांश रुग्णवाहिका या पाच लाख किमीच्या आसपास धावल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी काही रुग्णवाहिका यामध्ये बंद पडत असल्याने समस्या निर्माण होत आहे. जिल्ह्यात ५० टक्क्यांनी रुग्ण वाहिका वाढविण्याची गरज आहे.
परिणामी कोवीड संदिग्धांना वेळेत रुग्णालयात पोहोचविण्यास विलंब होत आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता सध्याच्या आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिकांचेही नियोजन प्रभावीपणे करण्याची गरज निर्माण झाली आहे. वर्तमान स्थितीतच रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याने संदिग्धांना रुग्णालयात हलविण्यासोबतच गंभीर रुग्णांना अकोला, औरंगाबाद हलविण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता पाहता आता रुग्णवाहिकांचीही पर्याप्त व्यस्था करण्याची गरज आहे. मार्च महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत १०८ रुग्ण वाहिकेद्वारे सहा महिन्यात १२ हजार ६८१ संदिग्धांना रुग्णालयात पोहोचवले आहे. १०८ रुग्ण वाहिकांची संख्या २३ असून त्यापैकी ११ रुग्णवाहिका या कोवीड संदर्भाने कार्यरत आहेत. टप्प्या टप्प्याने त्यांची संख्याही वाढविण्यात येत आहे. तब्बल ५८ चालक या वाहनांवर तीन शिप्टमध्ये काम करत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांच्या चाकांची गती वाढली रुग्णालयात जाण्यासाठी संदिग्धांना ताटकळत रहावे लागत असल्याचे चित्र आहे.
१०८ रुग्णवाहिका मार्च २०२० पासून आतापर्यंत सरासरी सव्वा लाख किमीपेक्षा अधिक धावल्या आहेत. काहींचे पाच लाख किमी झाले आहेत. त्यामुळे प्रसंगी काही रुग्णवाहिका बंद पडण्याची भिती असते. कोवीड सोबतच नॉन कोवीड रुग्णांनाही सेवा देण्याची दुहेरी कसरत करावी लागत आहे.
-डॉ. राजकुमार तायडे,
जिल्हा व्यवस्थापक, १०८ रुग्णवाहिका