राज्यातील अन्य नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी आमना नदी ‘मॉडेल’!
By admin | Published: May 25, 2017 12:48 AM2017-05-25T00:48:55+5:302017-05-25T00:48:55+5:30
आ. शशिकांत खेडेकर यांचे प्रतिपादन : नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्या हस्ते पूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : परिसरातील आमना नदीमुळे शेतीचे स्वरूप बदललेले आहे. त्यामुळे आमना नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी तसेच लोकसहभागातून १६ कि.मी. नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील इतर नद्यांच्या पुनरुज्जीवनााठी आमना नदी मॉडेल ठरली असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले.
५० वर्षांपासून आपले अस्तित्व जपणारी श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीतील आमना नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरण कामासाठी ३० जून २०१५ ला अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या पुढाकाराने तात्कालीन नगराध्यक्ष मालती कायंदे, सेवानिवृत्त अधिकारी रमेश कायंदे व नागरिकांच्या मदतीने सुरुवात करण्यात आली. आमना नदीमुळे शहराचा पाण्याचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून मार्गी लागलेला आहे. तसेच आमना नदीचे स्वरूप बदलण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात १६ कि.मी. रुंदीकरण आणि खोलीकरण कामाची सुरुवात झाली असून, महिको मोन्सॅन्टो कंपनीच्या लोकसहभागाने दोन कि.मी.कामाचा शुभारंभ आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुनीता शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, न.प. उपाध्यक्ष पवन झोरे, तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार मदन जाधव, ठाणेदार सारंग नवलकर, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, भाजपा नेते डॉ.रामदास शिंदे, पुरुषोत्तम धन्नावत, नगरसेवक नंदन खेडेकर, विजय उपाध्ये, अजय शिवरकर, नगरसेविका श्रीमती विमन माळोदे, पल्लवी वाजपे, शारदा जायभाये, मोन्सॅन्टो कंपनीचे तुकाराम बोले, सुमंत जोशी, कोणवळे, पंडित आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी करून आमना नदीच्या पाण्यामुळे शेतीला होणारे फायदे पटवून दिले. नगराध्यक्ष शिंदे, मुख्याधिकारी बोरीकर, तहसीलदार बाजड, ठाणेदार नवलकर यांनी शेतकऱ्यांना गाळ उचलण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना आ.डॉ. खेडेकर म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी शहरातून जाणारे महामार्गावरील पुलाच्या भागात रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात महामार्गाच्या वळण रस्त्यावर आमना नदीच्या दुसऱ्या पुलाचे काम सुरु आहे. या भागातील सीड्स कंपनीचे व्यवस्थापकासोबत चर्चा करून पुन्हा आमना नदीचा पूर्वेकडे ८.५० कि.मी., तर पश्चिमेकडे ८ कि.मी. शुशोभीकरण आणि खोलीकरण करण्याच्या कामासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संचालन नायब तहसीलदार मदन जाधव यांनी केले. यावेळी वसंतअप्पा खुळे, शिवसेना शहरप्रमुख मोरेश्वर मिनासे, जगदीश कापसे, सुनील शेजुळकर, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी, नागरिक व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. स्थानिक नगरपालिका कर्मचाऱ्याकडून आमना नदी खोलीकरणासाठी २ लाख ५० हजार रूपये मधून पहिला टप्पा ५६ हजार रुपयांचा धनादेश आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांना देण्यात आला.