अमरावती विभागाची ६४ टक्के महसूल वसुली !
By Admin | Published: March 21, 2016 01:44 AM2016-03-21T01:44:36+5:302016-03-21T01:44:36+5:30
निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न.
दादाराव गायकवाड/ कारंजा (जि. वाशिम)
राज्य शासनाने २0१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ठरवून दिलेल्या वसुलीच्या ३८७ कोटी ९३ लाखांच्या उद्दिष्टापैकी १८ मार्चपर्यंत अमरावती विभागाने २४६ कोटी ७३ लाख महसूल वसुली केली. हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या ६३.६0 टक्के असल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्तालयातून प्राप्त झाली आहे.
राज्य शासनाने सन २0१५-१६ वर्षासाठी अमरावती महसूल विभागाला महसूल वसुलीचे ३८७ कोटी ९३ लाखांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल वसुलीची मोहीम राबविण्यात येत आहे. या संदर्भात शनिवारी अमरावती विभागीय आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर उपरोक्त आकडेवारी प्राप्त झाली. अमरावती विभागात अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.
अमरावती विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (महसूल) आपाले यांनी सतत महसूल वसुलीसंदर्भात विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल अधिकार्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत वसुलीबाबत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना केल्या होत्या. राज्यातील सर्व महसुली विभागांना ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपल्यानंतर जमा रकमेचा कोषागार कार्यालयाशी ताळमेळ घेतल्याचे प्रमाणपत्र शासनाला सादर करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अमरावती विभागाकडून २0१५-१६ या आर्थिक वर्षात वसूल केलेल्या महसुलीची आकडेवारी ३१ मार्चनंतर शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. आता चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी ११ दिवसांचा अवधी असल्याने अमरावती विभागाकडून महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी कसून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याशिवाय वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्याची धडपड अधिकार्यांना करावी लागणार आहे. सद्यस्थितीत अमरावती विभागाची महसूल वसुली ६४ टक्क्यांच्या घरात आहे.
-----------------------------------------------------------------------------
जिल्हा उद्दिष्ट वसुली टक्केवारी
(आकडे लाखांत)
-----------------------------------------------------------------------
अमरावती - ११४४0 ६५९१.३४ ५७.६२
अकोला - ६४५५ ४८२७.३८ ७४.७१
यवतमाळ- ९0५0 ६१६१.२९ ६७.0८
बुलडाणा- ७४५५ ४५७६.१४ ६१.३८
वाशिम ४३९३ २५१६.९४ ५७.२९
---------------------------------------------------------------------------
एकूण ३८७९३ २४६७३.१ ६३.६0
*विभागात अकोला अव्वल
शासनाकडून निर्धारित करण्यात आलेल्या महसूल वसुलीत अमरावती विभागातून अकोला जिल्हा आघाडीवर आहे. या जिल्हय़ास यंदाच्या आर्थिक वर्षासाठी देण्यात आलेल्या ६४५५ लाखांच्या उद्दिष्टापैकी जिल्हा महसूल प्रशासनाने एकूण ४८२७.३८ लाखांची वसुली केलेली असून, हे प्रमाण तब्बल ७४ टक्के असल्याने, येत्या १0 दिवसांत ते उद्दिष्ट पूर्णही करण्याची शक्यता आहे. विभागात वाशिम जिल्हा सर्वात पिछाडीवर आहे. या जिल्हय़ास देण्यात आलेल्या ४३९३ लाखांच्या उद्दिष्टापैकी केवळ २५१६.९४ लाखांची वसुली जिल्हा महसूल प्रशासनाकडून करण्यात आली आहे. हे प्रमाण के वळ ५७.२९ टक्के आहे.