पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध; विवाहितेला घराबाहेर हाकलून लावले, गुन्हा दाखल
By अनिल गवई | Published: December 6, 2023 03:00 PM2023-12-06T15:00:14+5:302023-12-06T15:00:27+5:30
सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल
खामगाव: पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध दर्शविला असता पतीसह सासू-सासऱ्यांनी विवाहितेला मारहाण केली. तसेच घराबाहेर काढून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील केळगाव येथे घडली. या प्रकरणी खामगाव माहेर असलेल्या विवाहितेने शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सौ. गायत्री सचिन कदम (२२) या विवाहितेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, तिचे लग्न अहमद नगर जिल्ह्यातील केळगाव येथील सचिव बाळासाहेब कदम याच्याशी झाले. लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस सासरच्यांनी चांगले वागविले. मात्र, नंतर पतीचे बाहेर दुसऱ्या बाईशी अनैतिक संबंध उघड झाले. याला सासू सासरे यांची सहमती असून या प्रकाराला विरोध दर्शविला असता पती आणि सासू सासर्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून घराबाहेर काढून दिल्याचा आरोप तक्रारीत केला. या तक्रारीवरून पोलिसांनी पती सचीन बाळासाहेब कदम, सासू सौ. वच्छला बाळासाहेब कदम व सासरे बाळासाहेब उमाजी कदम या तिघांविरुद्ध कलम ४९८, ३२३, ५०६, ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.