अज्ञाताने शेतातील उभा ट्रॅक्टर पेटविला; गरीब शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 10:50 AM2022-08-17T10:50:13+5:302022-08-17T10:56:35+5:30
पवार यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर असून सध्या काम नसल्याने त्यांनी त्यांच्या गावाजवळील गोठ्यात ट्रॅक्टर उभा करुन ताडपत्रीने झाकून ठेवलेला होता.
बुलढाणा - गोठ्यात उभा असलेला ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्यावेळी पेटवून दिल्याची घटना चिखली तालुक्यातील कोलारा येथ घडली. त्यामध्ये, ट्रॅक्टर पूर्णपणे जळून खाक झालाय. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी चिखली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. कोलारा येथील गरीब शेतकरी शिवसिंग पवार यांच्याबाबत ही दु:खद घटना घडली आहे.
पवार यांच्याकडे जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर असून सध्या काम नसल्याने त्यांनी त्यांच्या गावाजवळील गोठ्यात ट्रॅक्टर उभा करुन ताडपत्रीने झाकून ठेवलेला होता. नेहमीप्रमाणे शेतकरी शिवशिंग पवार हे 12 आगस्टला सायंकाळी गोठ्यावरील शेळया आणि इतर जनावरांचे चारापाणी करून घरी गेले. त्यावेळी ट्रॅक्टर त्याठिकाणी सुस्थितीत होता. मात्र, त्याच मध्यरात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर पेटवून दिला. ट्रॅक्टर जळत असताना टायर फुटल्यानं परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आवाज आला, तेव्हा गोठ्याकडे काहीतरी जळताना दिसले. त्यामुळे त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली असता ट्रॅक्टर जळत असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांना दिसले. यावेळी ट्रॅक्टरमालक शेतकरी शिवशींग पवार यांना माहिती दिल्यावर ते सुद्धा घटनास्थळावर आले. सर्वांनी मिळून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ट्रॅक्टर जळून खाक झालेला होता.
ट्रॅक्टरचा फक्त सांगाडाच सध्या उरला असून शेतकरी शीवशिंग पवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पवार यांनी कर्ज काढून हा ट्रॅक्टर घेतलेला होता, सध्या त्याचे तीन हप्ते सुद्धा भरायचे बाकी असून त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी पवार यांनी चिखली पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. मात्र, या घटनेमुळे कोलारा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ या आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.