..तर शिवसेनाही मध्यावधीसाठी तयार - उद्धव ठाकरे
By admin | Published: June 15, 2017 08:15 PM2017-06-15T20:15:29+5:302017-06-15T20:15:29+5:30
शेगाव (जि. बुलडाणा) :मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव (जि. बुलडाणा) : मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवायचा असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
गुरुवार, १५ जून रोजी शेगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘साले’ म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो, अशी प्रार्थना आपण संत गजानन महाराजांकडे केली असल्याचे सांगत, कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, शेतकरी कर्जमुक्त नाही झाला, तर राज्यात भूकंप येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडत आलो; पण त्याचे कधीही राजकारण शिवसेना करीत नाही. शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते. हाच शिवसेनेचा पिंड आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे, असे शिवसेनेच्या बाबतीत कधी होत नाही. शिवसेना विघ्नसंतोषी नाही, पाप करणाऱ्यांची औलादही शिवसेनेत नाही, शेतकऱ्यांचा विश्वासघात करून राजकीय पोळी शेकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. पत्र परिषदेला शिवसेना उपनेते अरविंद सावंत, ना. रामदास कदम, ना. दिवाकर रावते, खा. प्रतापराव जाधव, खा. भावना गवळी, आ.गुलाबराव पाटील, आ. संजय रायमुलकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. शशिकांत खेडेकर आदींची उपस्थिती होती.
...तर मुहूर्ताची वाट पाहणार नाही!
सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली, तर पाच वर्ष हे सरकार पडू देणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, कर्जमाफीची घोषणा करून त्याची दिशाभूल केली जात असेल, तर शिवसेना राज्यात भूकंप घडवून आणेल. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
कर्जमुक्ती ही नोटाबंदीच्या पापाची परतफेड!
नोटाबंदीमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणूस देशोधडीला लागला असून, यातून कोणाचा फायदा झाला ते आपल्याला माहीत नाही; मात्र नोटाबंदीच्या या पापाची परतफेड शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीतून करावी लागल्याची बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. शेगाव येथे गुरुवारी आयोजित शिवसेनेच्या भव्य शेतकरी व पदाधिकारी मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. तत्त्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पूर्णत: अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.