अन् ‘त्या’ भुकेल्या बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:33 PM2020-04-01T17:33:33+5:302020-04-01T17:34:00+5:30
- नानासाहेब कांडलकर जळगाव -जामोद : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील आपल्या घराच्या ओढीने पायीच निघालेल्या 21 बालकांसह 40 मजुरांना जळगाव ...
- नानासाहेब कांडलकर
जळगाव -जामोद : मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील आपल्या घराच्या ओढीने पायीच निघालेल्या 21 बालकांसह 40 मजुरांना जळगाव येथे बुलढाणा अर्बन गोडाऊन जवळ थांबून सेवाभावी व्यक्तींनी भोजन दिले असता थकलेल्या व भुकेलेल्या दहा वर्षाखालील 21 बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आपले घरदार सोडून शेकडो किलोमीटर अंतरावर पोटाची खळगी भरण्यासाठी काम करणाऱ्या मजुरांची लॉक डाऊन मुळे होणारी पायपीट आता चिंतेचा विषय बनली आहे . संग्रामपूर तालुक्यातील टाकळी पंच येथे रस्त्याचे काम करणारे मजूर हे मूळचे बऱ्हाणपूर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावरील एका खेडेगावातील रहिवासी. कोरोना व्हायरसमुळे लॉक डाऊन झाले आणि रस्त्याचे काम थांबले. त्यामुळे या मजुरांना घराची ओढ लागली आणि ते डोक्यावर आपापल्या सामानाचे गाठोडे घेऊन पायीच निघाले. आपण घरी केव्हा पोहोचणार रस्त्याने आपली भोजनाची व्यवस्था कुठे होणार याची साधी कल्पना नसताना हे 40 जण टाकळी पंच वरून निघाले.यामध्ये दहा वर्षाखालील 21 बालके नऊ महिला त्यापैकी दोन गरोदर महिला आणि दहा पुरुष असा समावेश असलेला हा मजुरांचा लोंढा वडशिंगी नजीक पटवारी गजानन चव्हाण यांना दिसला आणि त्यांचे मन हेलावून गेले. त्यांनी जळगावला येऊन ही बाब सेवाभावी व्यक्तींना सांगितली आणि सुरू झाली या मजुरांना भोजन देण्याची तयारी.
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील व भाजपाचे जिल्हा महामंत्री नंदकिशोर अग्रवाल यांनी आपापल्या घरी खिचडी व अन्य भोजनाचे साहित्य बनविले आणि बुलढाणा अर्बनच्या वेअर हाऊस जवळ या मजुरांना अडवून तेथे त्यांना पोटभर जेवण दिले. सोबत ज्यूस आणि बिस्किटे हि दिली. यामुळे तृप्त झालेल्या या मजुरां सह छोट्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ते आनंदी झाले. भर उन्हात पस्तीस किलोमीटरचा पायी प्रवास करणारे हे मजूर व छोटी बालके थकून गेली होती. त्यांना दत्ताभाऊ पाटील , नंदकिशोर अग्रवाल व अन्य सेवाभावी व्यक्तींच्या रूपाने देवदूतच मिळाले. यावेळी ही सेवा देणाऱ्यांमध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखेडे, युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम पाटील ,हर्षद पाटील ,संकेत आबा रहाटे, योगेश पाटील यांचाही समावेश होता. गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.(तालुका प्रतिनिधी)