अंढेरा-मेरा बु. रस्ता गेला खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:33+5:302021-02-05T08:30:33+5:30
अंढेरा : गत दोन वर्षापासून अंढेरा फाटा ते मेरा बु. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ...
अंढेरा : गत दोन वर्षापासून अंढेरा फाटा ते मेरा बु. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहेत. रस्त्यावर सगळीकडेच धूळ असून, या सर्व प्रकाराने अंढेरा येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजाच्या दुर्लक्षामुळे अंढेरा फाटा ते मेरा बु. रोडची चाळणी झाली आहे. रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, रोडच्या दोन्हीही साइडच्या चरा खचल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून एकदाही साधी डागडुजी करण्यात आलेली नाही. अंढेरा फाटा हा रस्ता पुढे मेरा बु. व दरेगावमार्गे शेंदूरजनला जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहतूक सुरूच असते. अंढेरा गावात पोलीस स्टेशन, राष्ट्रीयीकृत बँका तसेच महाविद्यालय असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर खड्ड्यांबराेबरच धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा अंढेरा ग्रामस्थांनी दिला आहे. पालकमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या परिसरातच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे रस्त्याची वाट
मलकापूर-सोलापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू हाेते. या मार्गासाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक अंढेरा फाटा ते मेरा खुर्द रस्त्याने करण्यात आली. त्यामुळे, या रस्त्यावर माेठ माेठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले हाेते. मात्र, सहा महिने लाेटल्यावरही रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
अंढेरा फाटा ते मेरा बु. रोडच्या नवीन डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन तसेच रास्ता रोको करण्यात येईल.
सुभाष डोईफोडे, शिवसेना विभागप्रमुख, अंढेरा
रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून, यासंदर्भात कालच संबंधित ठेकेदार नितीन चौधरी यांच्याशी बोलणे झाले आहे. येत्या आठ दिवसात अंढेरा फाटा ते मेरा बु.रोडचे काम सुरू करण्यात येईल.
म्हस्के, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगाव राजा