२ हजारांवर अंगणवाड्यांना पोषण आहाराची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:05 AM2017-09-25T00:05:08+5:302017-09-25T00:05:36+5:30
बुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील २0 टक्केच अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजत असल्याने अद्याप २ हजार १६२ अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराची प्रतीक्षा आहे.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यातील २0 टक्केच अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार शिजत असल्याने अद्याप २ हजार १६२ अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराची प्रतीक्षा आहे.
अंगणवाडी केंद्राचे मानधन, कर्मचार्यांच्या रिक्त जागा, सेवानवृत्ती यासह विविध कारणांमुळे राज्यातील अंगणवाडी केंद्राच्या सेविका व मदतनीस यांनी संप पुकारला आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सहभाग आहे. या संपामुळे सहा वर्षांंपर्यंंतची बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आहार पोषण व आरोग्यसेवा विषयीच्या विविध सेवांच्या अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे; परंतु केंद्र शासनाच्या धोरणानुसार कुठल्याच परिस्थितीत अंगणवाडी केंद्रातील बालकांचा पोषण आहार बंद ठेवता येत नाही. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी बालकल्याण विभागाकडून तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील २५४ अंगणवाड्यांपैकी २२ अंगणवाड्यांमध्ये बचत गटामार्फत पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच ग्रामीण भागातील २ हजार ५१0 अंगणवाड्यांपैकी ५५0 अंगणवाड्यांमध्ये आशा वर्कर, महिला बचत गट, शालेय पोषण आहार आदींच्या माध्यमातून पोषण आहाराची व्यवस् था करण्यात आली आहे.
अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील एकूण २ हजार ७६४ अंगणवाड्यांपैकी ५७२ अंगणवाड्यांमध्ये महिला व बालविकास विभागाने शासनाच्या इतर विभागातील नागरी व ग्रामीण स्थानिक कर्मचार्यांच्या साहाय्याने पोषण आहार विनाखंड सुरळीत चालू केला आहे; मात्र अद्यापही ८0 टक्के अंगणवाड्यांमधील पोषण आहार सुरळीत चालू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार १६२ अंगणवाड्यांमधील हजारो बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे.
आजपासून १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये होणार आहार सुरू
जिल्ह्यातील शहरी भागातील २५४ अंगणवाड्यांपैकी २२ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र सोमवारपासून १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये आहार विनाखंडित सुरू करण्यात येणार आहे, तसेच ग्रामीण भागातील सर्व अंगणवाड्यांमध्येसुद्धा दोन दिवसांत बचत गट, आशा वर्करच्या माध्यमातून आहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आहार पुरवठय़ासाठी यांचा घेतला जातो सहभाग
अंगणवाडी सेविका व मदनीस यांच्या संप काळात अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार सुरळीत राहावा, यासाठी आशा कर्मचारी किंवा महिला बचत गटावर आहार वाटपाची जबाबदारी देण्याचे आदेश आहेत; मात्र आशा कर्मचारी किंवा महिला बचत गटांकडून आहार पुरवठा उपलब्ध होत नसल्यास त्या कार्यक्षेत्रातील इतर महिला बचत गट, माध्यमिक शाळेतील मध्यान्ह भोजन पुरविणारी संस्था, आश्रमशाळेतील भोजन पुरवठा करणारी संस्था किंवा स् थानिक आहार पुरवठादाराची तात्पुरत्या स्वरूपात आहार देण्यासाठी ग्राम समिती पुरवठादाराची निवड करून त्यांचा सहभाग आहार वाटपासाठी घेतला जातो.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संप काळात अंगणवाडी केंद्रावर आहार सुरळीत ठेवण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये सोमवारपासून आहार सुरळीत करण्यात येईल.
- सी.बी. चेके,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
बालविकास, बुलडाणा.