आॅनलाइन मानधनाचा पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना लाभ
By Admin | Published: July 4, 2017 12:11 AM2017-07-04T00:11:15+5:302017-07-04T00:11:15+5:30
विविध संघटनांच्या आंदोलनाला यश : रिक्त पदे भरण्याची मागणी
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अंगणवाडी सेविकांना मानधन दोन ते तीन महिने मिळण्यास विलंब होत होता. याबाबत विविध संघटनांनी अनेकदा आंदोलन करून मानधन वेळेवर देण्याची मागणी केली होती. याबाबतची दखल महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेऊन आॅनलाइन मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील ५ हजार १७१ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना होणार आहे.
ग्रामीण भागातील गोर-गरिबांच्या घराची चिमुकले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत ग्रामीण भागात अंगणवाड्या सुरू केल्या होत्या. बुलडाणा जिल्ह्यासाठी २ हजार ५७७ अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली होती, तर काही भागात १४१ मिनी अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. यासाठी २ हजार ५२१ अंगणवाडी सेविका, २ हजार ५१६ अंगणवाडी मदतनिस व १३४ मिनी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत; मात्र सदर अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविका यांना नियमित मानधन देण्यात येत नव्हते. त्यामुळे अनेक अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबियांना अडचणीचा सामना करावा लागत होता. याबाबत विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलने करण्यात आली. यावेळी मानधन नियमित मिळण्याचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात येत होता. याची दखल महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे मानधन एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा शुभारंभ ३ जुलै २०१७ रोजी करण्यात आला. त्याचा फायदा राज्यातील २ लाख ६ हजार व जिल्ह्यातील ५ हजार १७१ अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना होणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेत आनंद व्यक्त होत आहे.
सेविका-मदतनिसांची रिक्त पदे भरण्याची मागणी
४जिल्ह्यात अंगणवाडी सेविका यांची ५४ पदे रिक्त असून, मदतनिसांची ६१ व मिनी अंगणवाडी सेविकांची ७ असे एकूण १२२ पदे रिक्त आहेत. सदर पदे त्वरित भरण्याची मागणी संबंधित रिक्त पदे असलेल्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.
अंगणवाडी सेविका-मदतनिसांचे मानधन आॅनलाइन देण्याचा निर्णय चांगला असून, काही ठिकाणी असलेली रिक्त पदे भरण्याची गरज आहे. याबाबत प्रशासनाने दखल घेऊन अंगणवाडी सेविका-मदतनिसांची रिक्त पदे भरावीत.
-पंजाबराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना(सिटू).
अंगणवाडी सेविका व मदतनिसांना आॅनलाइन मानधन मिळणार असल्यामुळे त्यांना नियमित मानधन मिळणार असून, अडचणीपासून सुटका झाली आहे.
-सी.बी.चेके
उपमुकाअ , महिला व बालकल्याण जि.प.बुलडाणा