प्रत्येक कामात मदतनीस; पदभरतीत मात्र त्यांनाच खोे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 12:06 PM2021-08-02T12:06:25+5:302021-08-02T12:06:53+5:30
Buldhana News : अंगणवाड्यांमधील मनुष्यबळ जिल्ह्यात ५ टक्क्यांनी कमी आहे.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ग्रामीण भागातील माता व बालसंगोपणासह पोषण आहार, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ग्रामपातळीवर महत्त्वाचा दुवा असलेल्या अंगणवाड्यांमधील मनुष्यबळ जिल्ह्यात ५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे राज्य तथा केंद्राच्या योजनांच्या अंमलबजावणी स्तरावरच मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे या योजनांचा डोलारा सांभाळणे अवघड होत आहे. प्रत्येक शासकीय कामात मदतनीस हवी, असे असतानाही पदभरतीत मात्र त्यांनाच खो मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
शासनाची कुठलीही योजना असली की, त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मदत घेतल्या जाते. मात्र, त्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी दुर्लक्ष केल्या जात असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. २५ जून रोजी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त जागा भरण्याबाबत एकात्मिक बाल विकास विभागाने मान्यता दिली आहे. मात्र, यामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचीच पदे भरण्यात येत आहेत. यामध्ये अंगणवाडी मदतनीसच्या सर्वाधिक जागा रिक्त असतनाही, या पदभरतीमध्ये मदतनीसच्याच जागा भरण्यात येणार नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अंगणवाडी मदतनिसांवर कामाचा बोजा कायमच राहणार आहे. ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये दोन जागा आहेत, त्याठिकाणी एकाच मदतनिसावर कामाचा भार पडत असल्याने मदतनीस पदभरती होणे अपेक्षीत आहे.
सेविका, मदतनिसांची धावपळ
शासनाची कुठलीही योजना ग्रामीण भागात राबवयाची असेल, तर अंगणवाडी केंद्रावर त्याची जबाबदारी सोपविली जाते. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच राहत आहे. अंगणवाडीचे काम करून, लसीकरण, पोषण आहार वाटप, गावातील सर्वे यासारख्या अनेक कामांसाठी सेविका, मदतनिसांची धावपळ कायमच आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत आदेश आलेले आहेत. परंतू यामध्ये अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचीच पदे भरण्यात येणार आहेत. मदतनिसांची पदे भरण्याबाबत मंजूरी नाही.
- अरविंद रामरामे,
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, एकात्मिक बालविकास विभाग, जिल्हा परिषद बुलडाणा.