दीर्घ प्रतीक्षेनंतर अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 06:05 PM2018-07-17T18:05:44+5:302018-07-17T18:07:54+5:30
दीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा भाऊबिज निधी तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला असून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : आदिवासी, ग्रामीण भागातील कुपोषण दूर करण्यासाठी विविध प्रकारचे काम करणाºया अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना वाढीव मानधनासह दिवाळीनिमित्त भाऊबिज मिळावी, यामागणीसाठी विविध आंदोलने, मोर्चे काढून मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. याबाबत भाऊबिज म्हणून १ हजार रूपये निधी देण्याची घोषणा १८ मे २०१८ च्या शासननिर्णयान्वये करण्यात आली होती. शेवटी दीर्घ प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारा भाऊबिज निधी तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला असून लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जिल्ह्यातील आदिवासी, ग्रामीण कुपोषण दूर व्हावे यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतात. अशा प्रकारचे महत्वाचे काम करणाºया जिल्ह्यातील ५ हजार २१२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना भाऊबिज म्हणून १ हजार रूपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून सदर एकूण रक्कम ५२ लाख १५ हजार रूपये रक्कम शासनाकडून जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्पाकडे ११ जुलै रोजी वर्ग करण्यात आला आहे. त्यात बुलडाणा तालुक्यातील ५०५ अंगणवाडी सेविका, मतदनीस यांना ५ लाख ५० हजार, चिखली तालुक्यातील ६५२ लाभार्थ्यांना ६ लाख ५२ हजार, देऊळगाव राजा तालुक्यातील २५५ लाभार्थ्यांना २ लाख ५५ हजार, जळगाव जामोद तालुक्यातील ३३३ लाभार्थ्यांना ३ लाख ३३ हजार, खामगाव तालुक्यातील ४९० लाभार्थ्यांना ४ लाख ९० हजार, लोणार तालुक्यातील ३६५ लाभार्थ्यांना ३ लाख ६५ हजार, मलकापूर तालुक्यातील २७८ लाभार्थ्यांना २ लाख ७८ हजार, मेहकर तालुक्यातील भाग १ साठी ३२३ लाभार्थ्यांना ३ लाख २३ हजार, मेहकर तालुक्यातील भाग २ साठी २५५ लाभार्थ्यांना २ लाख ५५ हजार, मोताळा तालुक्यातील ४१९ लाभार्थ्यांना ४ लाख १९ हजार , नांदूरा तालुक्यातील ३४३ लाभार्थ्यांना ३ लाख ४३ हजार, संग्रामपूर तालुक्यातील ३५२ लाभार्थ्यांना ३ लाख ५२ हजार, शेगाव तालुक्यातील २३० लाभार्थ्यांसाठी २ लाख २३ हजार व सिंदखेड राजा तालुक्यातील ४१५ लाभार्थ्यांसाठी ४ लाख १५ हजार रूपये अनुदान बाल विकास प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
बँक खात्यात लवकरच निधी जमा होणार
शासनाने जिल्ह्यातील एकूण ५ हजार २१२ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात येणारी भाऊबिज निधी एकूण ५२ लाख १५ हजार रूपये जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्प विभागाकडून तालुक्यातील प्रकल्प कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सदर निधी लवकरच प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देण्यात आलेल्या भाऊबिज निधी प्रमाणे मानधन नियमित द्यावे.
-पंजाबराव गायकवाड, अध्यक्ष, अंगणवाडी कर्मचारी संघटना, सिटू, बुलडाणा.