अंगणवाडीसेविका- मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:11 PM2017-10-05T20:11:12+5:302017-10-05T20:12:00+5:30
बुलडाणा : गेल्या 26 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांवर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान सर्वांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या 26 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांवर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या. आंदोलनादरम्यान सर्वांना पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
संपकत्र्या अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून हे आंदोलन करण्यात आले. गुरुवारी दुपारी 12 वाजता सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाभरातून आलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस स्थानिक स्टेट बँक चौकात जमा झाल्या व त्यांनी हातात लाल झंडे घेत जोरदार घोषणाबाजीला सुरवात केली. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या ज्येष्ठ सभासद कुसूम चहाकर, जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. महिलांच्या जोरदार घोषणांनी स्टेट बँक परिसर दणाणून गेला होता. सुमारे अर्धा तास घोषणाबाजी केल्यानंतर अंगणवाडी महिला-सेविकांनी मुख्य मार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी वाहतुकीला बराच अडथळा निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलक महिलांना अटक करून त्यांना विविध गाड्यांमध्ये भरून पोलिस मुख्यालयाच्या आवारात आणले. या ठिकाणीही महिलांनी जोरदार घोषणाबाजी सुरूच ठेवली. या वेळी पत्रकारांशी बोलताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनवाढीसंदर्भात सरकारने गठित केलेल्या समितीने सेविकांना 10 हजार व मदतनिसांना सात हजार रुपये मानधन लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सरकारने हे आश्वासन पाळल्याने कृती समितीने संपाची हाक दिली होती. गेल्या 26 दिवसांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. मात्र तरीही सरकारला जाग येत नसल्यामुळेच आजचे हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पंजाबराव गायकवाड, कुसूम चहाकर, सचिव सरला मिश्रा, कोषाध्यक्ष जयश्री क्षीरसागर, उपाध्यक्ष मंदा डोंगरदिवे, सहसचिव माया वाघ, बेबी दाते, गोदावरी जाधव, सुवर्णा लाटे, प्रतिभा वक्ते, सुवर्णा पाटील, वर्षा शिंगणे, पुष्पलता खरात, पुंजाबाई चोपडे, अश्विनी सपकाळ, सुलोचना पाटील, सविता चोपडे, संगीता मादनकर, विजया राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.