मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By admin | Published: July 11, 2017 12:02 AM2017-07-11T00:02:18+5:302017-07-11T00:02:18+5:30

सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पुढाकार

Anganwadi workers' protest | मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

मानधनवाढीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीसाठी शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, यासह इतर मागण्यांसाठी सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर १० जुलै रोजी निदर्शने करण्यात आली.
सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाभरातून सीटू प्रणित महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सभासद जिल्हा परिषद कार्यालयासमोर जमा झाल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात जमलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. महिलांच्या आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले, अंगणवाडी सेविका तथा जि.प.सदस्य संगीता शिनगारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी सुनील मेसरे हे आंदोलनस्थळी आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २० जून २०१६ रोजी शासन व कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश करून मानधनवाढ समिती स्थापन करण्यात आली होती. अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनवाढीसंदर्भात या समितीने केलेल्या शिफारशी लवकरच लागू करू, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दोनदा दिले होते; मात्र हे आश्वासन पाळल्या गेले नाही, त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यासाठीच या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय निवेदनात मानधनवाढ समितीच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, पेन्शन, पदोन्नती, आरोग्य विमा, भविष्यनिर्वाह निधी लागू करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात मंदा डोंगरदिवे, जयश्री क्षीरसागर, सविता चोपडे, बेबी दाठे, संगीता मादनकर, सुनंदा मोरे, उषा जैवळ, प्रतिभा वक्टे, माया तायडे, सुवर्णा लाटे, अश्विनी सपकाळ, सुनीता पांडव, प्रतिभा आराख यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी व सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात मानधनवाढ समितीच्या शिफारसी मंजूर न झाल्यास जुलै महिन्याचा मासिक अहवाल देण्यावर बहिष्कार तसेच ११ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यभर अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संप पुकारतील, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला आहे.

Web Title: Anganwadi workers' protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.