अंगणवाडी सेविकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By अनिल गवई | Published: January 1, 2024 05:16 PM2024-01-01T17:16:06+5:302024-01-01T17:16:32+5:30
यावेळी थाळीनांद आंदोलन करून अंगणवाडी कर्मचार्यांनी शासनाविरोधात तीव्र निदर्शने केली.
खामगाव: अंगणवाडी सेविकांच्या आंदोलन दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहे. तालुका स्तरावरील आंदोलनाची धग आता जिल्हा स्तरावर पोहोचली असून, सोमवारी अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी थाळीनांद आंदोलन करून अंगणवाडी कर्मचार्यांनी शासनाविरोधात तीव्र निदर्शने केली.
याबाबत सविस्तर असे की, बुलढाणा जिल्ह्यातील पाच हजार सातशे अंगणवाडी सेविका आणि मदतनिस, अंगणवाडी कर्मचार्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, भरीव मानधन जाहीर करावे, सामाजिक सुरक्षा मिळावी, सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅज्युटीबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी, अंगणवाडी सेविका हे पद वैधानिक कर्मचारी म्हणून घोषित करावे. त्याअनुषंगाने येणारी वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधी आदी सर्व लाभ देण्यात यावे. अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. एकात्मिक बाल िवकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, आमदारांचे कार्यालय आणि खासदारांना घेराव आंदोलनानंतर सोमवारी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालवर आपला मोर्चा वळविला. थाळीनाद आंदोलनकरून जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर केले.
या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव सुरेखा तळेकर, शशिकला नारखेडे, नंदू गायकवाड, तुळसा भोपले, शालिनी सरकटे, अलका राऊत यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिस मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या.
यापुढील लढा मुंबईतून देणार
गत ८ वर्षा पासून अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, किमान वेतन २६ हजार, पेंशन, ग्रॅज्यूरी आणि सामाजिक सुरक्षा इत्यादी प्रमुख मागण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, सरकार त्यांच्या या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करित असल्याने आगामी आंदोलन मुंबईत करण्यात येणार असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले.