इंग्रजीमुळे अंगणवाडी सेविकांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:42 AM2021-04-17T11:42:34+5:302021-04-17T11:42:41+5:30

Anganwadi workers in trouble due to English : ॲपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत.

Anganwadi workers in trouble due to English | इंग्रजीमुळे अंगणवाडी सेविकांची दमछाक

इंग्रजीमुळे अंगणवाडी सेविकांची दमछाक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : केंद्र शासनाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना पोषण आहाराशी संबंधित माहिती भरण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करून दिले आहे. मात्र, या ॲपवर मराठी भाषा नसल्याने अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहेत. ॲपवर इंग्रजी व हिंदी या दोनच भाषांचा समावेश असल्याने माहिती भरताना अंगणवाडी सेविकांची दमछाक होत आहे.
जिल्ह्यातील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंबंधी दैनंदिन माहिती ऑनलाइन व्हावी, यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाइल रिचार्जची रक्कम देऊनही माहिती मोबाइल ॲपवर मराठीतून भरली जात असे. 
मात्र, १ एप्रिलपासून केंद्र शासनाच्या वतीने ही माहिती भरण्यासाठी कॉमन ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजी व हिंदी भाषेतून देण्यात आले आहे. या ॲपमध्ये माहिती समावेशित केलेल्या लाभार्थींना लाभ दिला जाईल, अशा सूचना दिलेल्या आहेत; परंतु या पोषण ट्रॅकर सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा उल्लेख नाही. सर्व माहिती इंग्रजी व हिंदी भाषेत आहे. त्यामुळे ही माहिती भरून घेण्यासाठी त्यांना इंग्रजी भाषा येणाऱ्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागत आहे. 
ग्रामीण भागात इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने या कामात व्यत्यय येत आहे. दरम्यान, मोबाइल रिचार्जचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा काम ठप्प होते. अंगणवाडी सेविकांनी नवीन ॲपवर माहिती भरण्यासाठी मराठी भाषेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अंगणवाडी सेविकांनी मागणी केली आहे. 
दरम्यान, अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बाल कल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडी सेविकांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले. पूर्वी अंगणवाडी सेविकांना सर्व माहिती रजिस्टरमध्ये नोंद करावी लागत असे. 
मात्र आता अंगणवाडी सेविका मोबाइलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती प्रणालीद्वारे केली जाणार आहे. 
स्मार्टफाेनमध्ये कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर असून, यातून सर्व उद्दिष्ट पूर्ण होणार आहेत. 
मात्र आता भाषेचा प्रश्न निर्माण झाल्याने अंगणवाडी सेविकांची डोकेदुखी वाढली आहे.

लाभार्थींचा मोबाइल क्रमांक केला अनिवार्य 
 पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरताना समस्या निर्माण होत असून, त्यातच लाभार्थीचा मोबाइल क्रमांक अनिवार्य केल्याने ज्या लाभार्थीकडे मोबाइल नाही, त्यांना अडचणी येत आहेत. 
 काही लाभार्थींची माहिती या ॲपमध्ये समाविष्ट झाली नाही, तर त्यांना पोषण आहाराचा लाभ न मिळाल्यास त्यांचा रोष अंगणवाडी सेविकांवर येऊ शकतो. त्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: Anganwadi workers in trouble due to English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.