‘अंगणवाडी सेविकांचे मानधन अन्य कर्मचाऱ्याप्रमाणे नियमित देणार’ - यशोमती ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:15 AM2020-07-11T11:15:02+5:302020-07-11T11:15:16+5:30
हेडमध्ये शुन्य बॅलन्स असतांनाही अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित करण्यात येईल. त्यासाठी महा विकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अन्य शासकीय कर्मचाºयाप्रमाणेच राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन हे नियमित स्वरुपात देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासन घेणार असल्याचे संकते राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी १० जुलै रोजी बुलडाणा येथे दिले.
अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे संंबंधीत हेडमध्ये शुन्य बॅलन्स असतांनाही अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित करण्यात येईल. त्यासाठी महा विकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.
बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. यावेळी आ. राजेश एकडे, माजी आ. राहूल बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा पवार, महिला व बाल विकास सभापती ज्योती पडघान यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, मध्यंतरी आशा वर्कसचे मानधन वाढविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर अंगणवाडी सेविकांचेही मानधन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या.
कोरोना संसर्गाच्या काळात पोषण आहार पोहोचविण्याचे आव्हान होते. मात्र ते योग्य पद्धतीने सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. जिल्ह्यात काही भागात अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. येत्या काळात त्या बांधण्यास प्राधान्य राहील, असेही त्या म्हणाल्या.
जिल्हास्तरावरही महिला आयोगाचे कार्यालय उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न असून या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचारासोबतच महिलांवरील अत्याचार कमी होण्यास मदत मिळले. यवतमाळप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातही कुमारी मातांचे प्रमाण आढळून आले असून त्याचे प्रमाण कमी असले तरी असे प्रकार व्हायला नको, असे त्या म्हणाल्या. बुलडाणा येथील कै. ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्याचा मुद्दा विचाराधीन असून त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न आपण करू. तसा प्रस्ताव आल्यास त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आपला विभाग कटीबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात२ चांगले काम होत असून अमरावती विभागातील स्थिती पाहता येथील कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. या संसर्गाच्या काळात राजकारणाला थारा न देता कोरोना रोखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
रुलर मार्ट उभारणार
वाशीम जिल्ह्याप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातही बचत गटांच्या महिलांनी उत्पादीत केलेले साहित्य व वस्तू विक्रीसाठी त्यांना एक बाजार पेठ मिळावी म्हणून बचत गटांचे रुलर मार्ट बुलडाण्यात उभारणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्यासाठी नाबार्ड कडून मदत घेणार असून यातून या बचत गटांना त्यांचे व्यवसाय करणे सुलभ जाईल.