संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध

By सदानंद सिरसाट | Published: April 22, 2023 04:29 PM2023-04-22T16:29:51+5:302023-04-22T16:30:21+5:30

जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रे सुरू करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

angry farmers paid homage to the government in buldhana | संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध

संतप्त शेतकऱ्यांनी केले सरकारचे श्राद्ध

googlenewsNext

वरवट बकाल, खामगाव -बुलढाणा: शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात अक्षय तृतीयेनिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा नैवेद्य व पान टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासनाचे श्राद्ध घालून निषेध करण्यात आला.

जिल्ह्यातील १५ दिवसांपासून बंद असलेले शासकीय हरभरा खरेदी केंद्रे चालू करा, खरिपातील लाल कांद्याला अनुदान घोषित केले त्याच धरतीवर विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला अनुदान द्या. संग्रामपूर, जळगाव तालुक्यात चक्री वादळाने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून आपत्तग्रस्तांना घरे बांधकामासाठी निधी द्या. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई करून विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करा. सततच्या पाऊस व अतिवृष्टिने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई वाटप करा. या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. संग्रामपूर तहसीलच्या गेटसमोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रशासनाच्या नावाने केळीच्या पानावर सर्व वस्तूंसह नैवेद्य दाखवण्यात आला.

राळ, कापूर व धूप अगरबत्ती करून सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दोन दिवसांत निर्णायक भूमिका घ्यावी अन्यथा मुंबई विधान भवनासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उज्ज्वल पाटील चोपडे, विजय ठाकरे, सागर मोरखडे, विशाल चोपडे, रामदास सरदार, विलास तराळे, धनंजय कोरडे, अनुप देशमुख, राजेश उमाळे, श्रीकृष्ण शेजोळे, कैलास ठाकरे, अंकुश सुलताने, प्रवीण पोपळणारे, प्रफुल करांगळे, श्रीकृष्ण बोरोकार, संदेश ठोंबरे, योगेश बाजोड, हरिदास आमझरे, श्रीकृष्ण भवर, नंदू दहिकर, दीपक बोयाकेसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: angry farmers paid homage to the government in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.