संतप्त ग्रामस्थांनी शाळेलाच ठोकले कुलूप; गटशिक्षणाधिकारी धावतच आले
By अनिल गवई | Published: July 31, 2023 07:06 PM2023-07-31T19:06:26+5:302023-07-31T19:06:57+5:30
वर्ग पाच आणि शिक्षक एक
खामगाव : पाच वर्गांसाठी एकच शिक्षक असल्याने तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे. शिक्षणासाठी वारंवार निवेदन देऊनही कोणताच उपयोग होत नसल्याने शिराळा येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड आणि केंद्रप्रमुखांनी भेट दिली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, खामगाव तालुक्यातील शिराळा येथे इयत्ता एक ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पाच वर्गासाठी एकच शिक्षक असल्याने शाळेतील शिक्षणाचा दर्जा खालावला. त्यामुळे या शाळेत शिक्षक देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. याकडे शिक्षण विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन सुरू केले. या आंदोलनात दादाराव ठोंबरे, रंजित कारंडे, सुनिल िशंदे, पोपट ठोंबरे, युवराज तायडे, जनार्दन पंखुले विजय तायडे, डॉ. संतोष हटकर यांच्यासह ग्रामस्थांनी सहभाग दिला.
गट शिक्षणाधिकाऱ्यांची गावकऱ्यांशी चर्चा
शिराळा येथील शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच, गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड, केंद्र प्रमुख गवारगुरू यांनी शाळेला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. शिक्षकांची समस्या सोडविणार असल्याचे आश्वासनही यावेळी शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याचे समजते.