उभ्या पिकात घुसवली जनावरे! उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 01:45 PM2018-04-25T13:45:28+5:302018-04-25T13:49:49+5:30
पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
बुलडाणा - पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते.
जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडत असतानाच, शेतमालाच्या भावात गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घसरण होत आहे. उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच काही पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर कडाडले असतानाच, वांग्याचे दर झपाट्याने कोसळले आहेत. वांग्यासोबतच भेंडी आणि टरबूजाच्या भावात घसरण आहे. शिवाय पाणी टंचाई आणि वाढत्या उन्हाच्या झळांमुळे ‘मल्चिंग पेपर’वरची टरबूज शेती उन्हामुळे धोक्यात आली आहे. मोठ्याप्रमाणात उत्पादन खर्च केल्यानंतरही अपेक्षीत उत्पादन होत नसल्याने, शेतकºयांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून, भाजीपाला बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भाजीपाला बाजारपेठेत नेण्याऐवजी काही शेतकरी या पिकांचा जनावरांच्या चाºयासाठी उपयोग करीत असल्याचे चित्र परिसरात आहे.
शेतमाल बाजारपेठेत नेण्याचाच खर्च अधिक!
गेल्या काही दिवसांपासून बाजारात वांग्याचे दर कमालिचे घसरले आहेत. किरकोळ बाजारपेठेत वांगी ८ ते १० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत. घाऊक बाजारपेठेत त्यापेक्षाही कमी दर किलोमागे मिळत आहे. मिळणाºया भावापेक्षा खर्च अधिक असल्याने खामगाव, नांदुरा आणि शेगाव तालुक्यातील शेतकरी उभ्या पिकाचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करीत आहेत.
उत्पादन खर्चापेक्षा मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतमालाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे पिकविलेले उत्पादन बाजारपेठेत नेण्याचाही खर्च निघत नाही. नाईलाज म्हणून वांगी आणि इतर पिकांचा जनावरांना चारा म्हणून वापर करीत आहे.
- वासुदेव गव्हाळे, शेतकरी, ता. खामगाव.