अण्णा भाऊंचे अप्रकाशित साहित्य नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:34 AM2021-07-29T04:34:03+5:302021-07-29T04:34:03+5:30

बुलडाणा : काळजातून जेव्हा शब्द कागदावर उमटतात, तेव्हा साहित्यकृती निर्माण होते. त्या अर्थाने समाजाच्या अन् उपेक्षितांच्या वेदनांची ‘सल’ ठेवून ...

Annabhau's unpublished literature is on the verge of extinction | अण्णा भाऊंचे अप्रकाशित साहित्य नामशेष होण्याच्या मार्गावर

अण्णा भाऊंचे अप्रकाशित साहित्य नामशेष होण्याच्या मार्गावर

Next

बुलडाणा : काळजातून जेव्हा शब्द कागदावर उमटतात, तेव्हा साहित्यकृती निर्माण होते. त्या अर्थाने समाजाच्या अन् उपेक्षितांच्या वेदनांची ‘सल’ ठेवून लिहिल्यामुळे अण्णा भाऊ साठे यांची साहित्यनिर्मिती ‘अस्सल’ ठरली अन् ते खऱ्या अर्थाने ‘साहित्यरत्न’ ठरले, असे प्रतिपादन पत्रकार राजेंद्र काळे यांनी करून, काळाच्या ओघात अण्णा भाऊंचे अप्रकाशित साहित्य, की जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, त्याचा शोध घेऊन त्या साहित्याच्या प्रकाशनासाठी विजय अंभोरे यांच्या नेतृत्वात अण्णा भाऊ साठे सोशल फोरमने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंतीदरम्यान म्हणजेच २० जुलै ते १ ऑगस्टदरम्यान अण्णा भाऊंच्या नावाने आयोजित व्याख्यानमालेचे नववे पुष्प सोमवारी (दि. २६) सायंकाळी ऑनलाईन पद्धतीने ‘अण्णा भाऊ साठे सोशल फोरम, महाराष्ट्र राज्य’ या फेसबुक पेजवरून पत्रकार राजेंद्र काळे यांनी गुंफले. ‘अण्णा भाऊंचे प्रगल्भ साहित्यविश्व’ या विषयाची मांडणी करताना त्यांनी अण्णा भाऊंच्या अप्रकाशित साहित्याच्या प्रकाशनाच्या दृष्टीने शोध घेण्याचे आवाहन करताना, हे साहित्य भविष्याचा वेध घेऊ शकते, अशा भावनाही त्यांनी मांडल्या. फोरमच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेची माहिती आरंभी आयोजक अ‍ॅड. डिगांबर अंभोरे यांनी देऊन, विजय अंभोरे यांच्या प्रेरणेतून समाजहिताच्या दृष्टीने स्थापन झालेल्या फोरमचे उद्दिष्टही विशद केले.

अण्णा भाऊंचे प्रगल्भ साहित्यविश्व

यात ३५ कादंबऱ्या, त्यात १९५९ मध्ये लिहिलेली ‘फकिरा’ की जिला १९६९ मध्ये राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. १५ लघुकथांचा संग्रह, ज्यात मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये व २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या. ‘रशियातील भ्रमंती’ हे प्रवासवर्णन, १२ चित्रपटांच्या पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील १० गाणी एवढं अफाट अन् तेवढंच अचाट साहित्यविश्व अण्णा भाऊंनी त्यांच्या लेखणीतून साकारलं. अण्णा भाऊंच्या साहित्याचा अन् त्यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणारी तब्बल १३ पुस्तके आतापर्यंत अन्य साहित्यिकांची प्रकाशित झाली असल्याची माहिती यावेळी पत्रकार राजेंद्र काळे यांनी दिली.

Web Title: Annabhau's unpublished literature is on the verge of extinction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.