२७५0 कोटींचा वार्षिक आराखडा तयार
By admin | Published: April 1, 2017 02:21 AM2017-04-01T02:21:47+5:302017-04-01T02:21:47+5:30
बुलडाणा जिल्हा नियोजन; पीक कर्जासाठी भरीव तरतूद.
बुलडाणा, दि. ३१- जिल्ह्याचा २0१७- १८ वर्षाकरिताचा २७५0 कोटींचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पीक कर्जासाठी १४५0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आराखड्याचे विमोचन करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्याचा २0१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून, यामध्ये १४५0 कोटी रुपयांची अधिकाधिक रक्कम पीक कर्जासाठी देण्यात आली आहे. यातील १३५६ कोटी खरीप, तर १0२ कोटी रुपयांची तरतूद रब्बी पीक कर्जासाठी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या पीक कर्ज घेण्याकरिता पात्र शेतकरी १ लाख ३६ हजार आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील बिगर कर्जदार नोंदणीकृत शेतकर्यांची संख्या १ लाख ७९ हजार आहे. १ एप्रिल २0१७ रोजी ६३ हजार ५२९ शेतकरी पीक कर्जासाठी पात्र ठरणार असून, १ जुलै २0१७ रोजी ६८ हजार ४ शेतकरी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांना नवीन कर्ज घेण्याकरिता ३१ जूनपूर्वी पीक कर्जाची रक्कम घेण्याची गरज आहे.
यासोबतच दीर्घ मुदत, मध्यम मुदत शेती कर्जासाठी ३३५ कोटी, सूक्ष्म- मध्यम व लघू व्यावसायिकांसाठी २0१ कोटी, शैक्षणिक कर्जासाठी २0.१६ कोटी, गृह कर्जासाठी प्रधानमंत्री आवास योजना विशेष प्राधान्याकरिता २६८.७८ कोटी व अन्य बाबींसाठी ४६५.५0 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अन्य बाबींमध्ये जिल्हा उद्योग केंद्र २९ कोटी तसेच महिला बचत गटांसाठी २९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्ह्याचा २0१७ - १८ चा वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तिकेचे विमोचन करताना दुय्यम निबंधक पालोदकर, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक पी. एन. श्रोते, जिल्हा बँकेचे सीईओ अशोक खरात, जिल्हा विकास प्रबंधक सुभाष बोंदाडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे राजेश परब, ग्रामीण बँकेचे टी.एफ. वानखडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या सोनाली देवरे, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रवीण कुरमे, ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे संचालन प्रणय सावजी यांची उपस्थिती होती.