बुलडाणा जिल्ह्यात आणखी ८३७ पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 10:47 AM2021-03-06T10:47:11+5:302021-03-06T10:47:19+5:30
CoronaVirus in Buldhana गेल्या एक वर्षाच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने संदिग्ध रुग्ण बाधीत आढळून आल्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागले.
बुलडाणा: कोरोनामुळे गेल्या ४८ तासात जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल ८३७ जण कोरोना बाधीत आढळून आले आहे. गेल्या एक वर्षाच्या कालावधीत इतक्या मोठ्या संख्येने संदिग्ध रुग्ण बाधीत आढळून आल्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागले.
गेल्या ४८ तासात तिघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १९८ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर सध्या १ टक्क्यावर आहे. दुसरीकडे तालुकानिहाय कोरोना बाधित रुग्णांचीही संख्या वाढली असून एकट्या बुलडाणा तालुक्यात तब्बल १२७ जण कोरोना बाधीत आढळले आहे. खामगावमध्ये ५७, शेगावमध्ये ९०, देऊळगाव राजात ५४, चिखलीत ८३, मेहकरमध्ये ३६, नांदुरा ६१, लोणार ९, मेताळा ६१, जळगाव जामोद ७७, सिंदखेड राजा ४७, संग्रामपूर ९२, लाखनवाडा दोन, खासगी रुग्णालयातील १२ बाधित मिळून ८३७ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असला तरी ते नेमके कोठील आहेत, हे स्पष्ट होवू शकलेले नाही.
दरम्यान जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २० हजार ९२५ झाली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट २३.४१ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या जिल्ह्यात ८६.४८ टक्के आहे.
बत्ती गुल झाल्याने वाढली संख्या
कोवीड समर्पीत रुग्णालयात असलेल्या प्रयोगशाळेचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने गुरूवारी फक्त रॅपीड टेस्टचे अहवाल देण्यात आले होते. नंतर वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दोन दिवसांचे अहवाल ६ मार्च रोजी एकत्र देण्यात आल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे. मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने व त्यातच ४८ तासात तिघांचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना संक्रमण जिल्हयात वाढल्याचे सार्वत्रिक चित्र तुर्तास तरी दिसत आहे.