खामगावातील भूखंड घोटाळ्यात आणखी एका आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:31 PM2020-06-19T12:31:15+5:302020-06-19T12:31:24+5:30
बनावट मालक म्हणून उभा राहणाऱ्या प्रभाकर पिसे याला गुरूवारी अडसुळ ता. शेगाव येथून अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील बहुचर्चित निलंबित तलाठी राजेश चोपडे प्लॉट घोटाळा प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या मुसक्या शहर पोलिसांनी आवळल्या आहेत. मुळ मालकाच्या नावे बनावट मालक म्हणून उभा राहणाऱ्या प्रभाकर पिसे याला गुरूवारी अडसुळ ता. शेगाव येथून अटक करण्यात आली.
खामगाव येथील भाग-१ चा निलंबित तलाठी राजेश चोपडे याने शासकीय दस्तवेजात खाडाखोड, छेडछाड तसेच पाने फाडून मोठ्या प्रमाणात प्लॉट खरेदी-विक्रीचा घोटाळा केला. याप्रकरणी राजेश चोपडेसह इतरांवर फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल झाले. यामध्ये आतापर्यंत चोपडेसह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांना जामिन मंजूर करण्यात आला आहे. गुरूवारी शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अनारकर आणि पोकॉ. हटकर यांनी सापळा रचून प्रभाकर पिसे रा. अडसुळ यास अटक केली. त्यामुळे प्लॉट घोटाळ्यातील आरोपींचे धाबे दणाणले आहे.
एक आरोपी सापडला होता जुगार खेळताना !
प्लॉट घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार तलाठी राजेश चोपडे याचा खासमखास असलेला दलाल पंकज घोरपडे याने याप्रकरणी न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळविला आहे. गत आठवड्यात शेगाव रोडवरील एका हॉटेलात पंकज घोरपडे याला जुगार खेळताना अटक करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे प्लॉट घोटाळ्यातील रक्कमेचा मुख्य सुत्रधारांसह इतर आरोपींकडूनही चैनींच्या वस्तू खरेदी करणे आणि शौकांसाठी वापर करण्यात येत असल्याचे आता समोर येत आहे.