91व्या अ.भा.म.साहित्य संमेलनाच्या स्थळाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं नोंदवला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 10:46 AM2017-09-11T10:46:49+5:302017-09-11T10:53:44+5:30
91वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. मात्र संमेलनाच्या स्थळाची घोषणा करण्यात आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे.
बुलडाणा, दि. 11 - ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. मात्र संमेलनाच्या स्थळाची घोषणा करण्यात आल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. हिवरा आश्रम हा वादग्रस्त शुकदास महाराजांचा असल्याने, त्या ठिकाणी संमेलन घेऊ नये, अशी मागणी अंनिसंनं केली आहे. अंनिसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी हा आक्षेप घेतला असून, त्यासाठी त्यांनी श्याम मानव यांनी शुकदास महाराजांच्या केलेल्या भांडाफोडचा दाखलाही दिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व संघटक श्याम मानव यांनी याबाबत फेसबुकवर आपला विरोध दर्शवला आहे.
नेमके काय म्हटले आहे श्याम मानव यांनी ?
साहित्य संमेलन भोगीदास आश्रमात? शुकदास महाराजाच्या हिवरा आश्रमात अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याचे कळते. विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापडणाऱ्या, पण प्रत्यक्षात 'रजनिशांच्या तंबूतील उंट'असणाऱ्या ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छिते.
दै. 'लोकमत'मध्ये 1984 मध्ये शुकदासाचे ढोंग उघडकीस आणणारे चार लेख मी लिहिले होते. त्यात ब्रह्मचारी असण्याचे सोंग घेणारा हा शुकदास सुंदर मुलींना एकट्यात 'गेल्या जन्मी मी भगवान कृष्ण ,तू राधा'असे सांगून कसे फशी पाडून त्यांचे शोषण करत असे हे विस्ताराने लिहिले आहे.'कृष्णाचे सोंग घेणारा राधेचा शुकदास' कसा श्रद्धेचा फायदा घेऊन फसवतो हे आजही माझ्या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या'बुवाबाजी बळी स्त्रियांचा' या पुस्तकात वाचू शकता. असल्या ढोंगी बाबाला व त्याच्या शोषणाला साहित्य संमेलन प्रतिष्ठा देणार असेल तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्व समविचारी पुरोगामी संघटनांच्या सह कडाडून विरोध करेल. संपूर्ण परिसरात' शुकदासांच्या रासलीला' जाहीर सभांद्वारे पुन्हा जनतेसमोर मांडू आणि रसिकांचे प्रबोधन करू.
श्याम मानव, संस्थापक व संघटक,अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
हिवरा आश्रमात होणार अ.भा.म.साहित्य संमेलन
९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी नागपुरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाच्या यजमानपदाचा मान ‘विवेकानंद आश्रम’ या संस्थेला देत असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले.
संमेलनस्थळाच्या पाहणी समितीने रविवारी सकाळी अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे उरले होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. महामंडळाच्या एकूण १९ सदस्यांपैकी १६ सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. तीन सदस्य अनुपस्थित होते. यातील सात मते बडोद्याला तर नऊ मते हिवरा आश्रमला मिळाली. अखेर बहुमताच्या आधारे संमेलन हिवरा आश्रमला देण्याचा निर्णय झाला, अशी माहिती डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली. या पत्रपरिषदेला महामंडळाचे कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, उपाध्यक्ष सुधाकर भाले, कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे व महामंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. या निर्णयामुळे सात वर्षांनंतर विदर्भाला पुन्हा संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. याआधी २०१२मध्ये ८५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चंद्रपूरच्या सर्वोदय शिक्षण मंडळाने आयोजित केले होते.
संमेलनाध्यक्ष डिसेंबरमध्ये
संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमही या वेळी जाहीर करण्यात आला. १४ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी महामंडळाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्याच दिवशी संध्याकाळी ७ नंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. १० डिसेंबर रोजी नव्या संमेलनाध्यक्षांचे नाव जाहीर करण्यात येईल.