पुरातन वास्तू बेवारस
By admin | Published: December 25, 2014 11:51 PM2014-12-25T23:51:23+5:302014-12-25T23:51:23+5:30
लोणार परिसरातील पुरातन वास्तुंची सुरक्षितता धोक्यात.
लोणार (बुलडाणा) : प्राचीन संस्कृतीचा वारसा असलेल्या येथील ८ व्या ते १६ व्या शतकातील पुरातन वास्तू सुरक्षेअभावी बेवारस अवस्थेत पडल्या आहेत. इतिहासाची साक्ष देणार्या या पुरातन वास्तुचे अवशेष आडगळीत पडल्याने या पौराणिक वास्तुचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. सिंदखेडराजा येथील राजवाड्यातून शिवकालीन तोफ चोरीला गेल्यानंतर शहरातील पुरातन वास्तुंच्या संरक्षणाचा आढावा घेतला. असता ८ व्या ते १६ व्या शतकातील प्राचीन संस्कृतीची साक्ष देणारे येथील अहिल्यादेवी होळकर अन्नछत्राचे अवशेष पार गळून पडले असल्याचे दिसून आले. तसेच जागोजागी या प्राचीन वास्तुचे अवशेष ढासळ्याने या वास्तुचे महत्व नष्ट होत चालले आहे. अन्नछत्राच्या चारही बाजूने अतिक्रमण झाल्याने येणार्या पर्यटकांना या वास्तुचे दर्शनही घडत नाही. वास्तुच्या सुरक्षिततेसाठी येथे कर्मचारीही उपलब्ध नसल्याने या वास्तुचे प्राचीन अवशेष चोरीला गेले असल्याचे समजते. अशीच काहीशी अवस्था शहराच्या मध्यभागी असलेल्या दैत्यसुदन मंदिराची झालेली असून मंदिराच्या परिसरात सुंदर नक्षीकाम केलेले प्रभू श्री रामाने रावणाचा वध केल्यानंतर साजरा केलेल्या विजयोत्सवाचे शिल्प धूळखात पडलेले आहे. इतकेच नाही तर महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी आणि देवगीरीचे राजे कृष्णदेव यांच्या भेटी संबंधीचे यादवकालीन शिलालेख ही अडगळीत पडलेले आहेत. शहरात एकूण चार पुरातन शिलालेख पडलेले आहेत. तर याचे वाचन करुन ते समजण्याचा प्रयत्नही पुरातत्व विभागाकडून झालेला नाही. एकीकडे शासनस्तरावरुन लोणारला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर दुसरीकडे शहरातील या प्राचीन वास्तुंच्या सुरक्षीततेकडे पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अवशेष चोरीला जात आहेत.
*शिव पार्वतीची मुर्ती चोरीला
येथील पुरातन यट्ठोश्वराच्या मंदिरातील प्राचीन शिव पार्वतीची मुर्ती गेल्या कित्येक महिन्यापासून दिसेनाशी झाल्यामुळे ती चोरीला गेल्याचा संशय इतिहास तज्ञ सुधाकर बुगदाणे यांनी व्यक्त केला आहे. पूरातन विभागाच्या अधिकार्यांकडून या प्राचीन वास्तुंच्या अवशेषांची विक्री होत असल्याचे समजते.