पॉलिटेक्निक प्रवेशासाठी १७ दिवसांत २५५ विद्यार्थ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 12:20 PM2021-07-18T12:20:18+5:302021-07-18T12:20:26+5:30
Applications of 255 students in 17 days for polytechnic admission : कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दरवर्षी दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निकसाठी अर्ज प्रक्रियेस सुरुवात केली जाते. यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ मिळावा याकरिता आधीच ३० जूनपासून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. ३० जूनपासून आजपर्यंत १७ दिवसांत २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती खामगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर प्रभुणे यांनी दिली.
बुलडाणा जिल्ह्यात केवळ एकच पॉलिटेक्निक कॉलेज असून, या कॉलेजमध्ये ३६० विद्यार्थी क्षमता आहे. विविध अभ्यासक्रमांतर्गत येथे शिक्षण दिले जात असून, याकरिता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला असला तरी अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. १६ जून रोजी दहावीचा निकाल लागला असल्याने आता या प्रवेश प्रक्रियेला गती येणार असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी पॉलिटेक्निकसाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत होते. हे प्रमाण काही वर्षांपासून कमी झाल्याचे दिसून येत असले तरी खामगाव येथील महाविद्यालयात मात्र १०० टक्के विद्यार्थी असतात. जिल्ह्यात खासगी पाॅलिटेक्नीक महाविद्यालये असून तेथेही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
निकाल लागला, आता येणार गती
दहावीचा निकाल लागल्यानंतर पॉलिटेक्निकमध्ये अर्ज भरण्यासाठी दरवर्षी गती येते. याहीवर्षी दहावीच्या निकालानंतर गती येणार आहे. १६ जुलै रोजी निकाल लागल्याने यापुढे अर्जांची वाढ होण्याची शक्यता आहे. अर्जासाठी विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचा दाखला लागतोय, म्हणून गती मंदावते.
खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. यासोबतच जास्तीत जास्ती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळण्याकरिता प्रयत्न केले जातात. कोरोनाकाळातही गतवर्षी विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश झाले होते. १९६१ पासून ही परंपरा सुरू आहे. यावर्षीही १०० टक्के प्रवेश होतील.
- डॉ. समीर प्रभुणे, प्राचार्य,
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, खामगाव