मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी १२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज; १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
By दिनेश पठाडे | Published: July 3, 2024 05:47 PM2024-07-03T17:47:39+5:302024-07-03T17:47:56+5:30
भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ बुलढाणा : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित ...
भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ
बुलढाणा : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी योजनांचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २८० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. ज्यांनी अजूनही नोंदणी केली नाही, त्यांना पुन्हा संधी असून १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील नवीन अर्ज व २०२२-२३ या वर्षातील अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा ११ ऑक्टोबर २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि अनुसूचित प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अनुसूचित प्रवर्गाकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शिष्यवृत्तीच्या लाभापासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. ३० जून ही मुदत देण्यात आली होती. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कमी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही नवीन अर्ज किंवा अर्जाचे नूतनीकरण केले नसेल, त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त कार्यालयाने केले आहे.