कोविड रुग्णांच्या देयक तपासणीसाठी १८ ऑडिटरची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:37 AM2021-05-11T04:37:05+5:302021-05-11T04:37:05+5:30
बुलडाणा : खासगी काेविड रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे़ या तक्रारींची दखल घेत ...
बुलडाणा : खासगी काेविड रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे़ या तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णाालयांतील काेविड रुग्णांच्या देयक तपासणीसाठी १८ ऑडिटरची नियुक्ती केली आहे़
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकूण ६० खासगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोविड केअर सेंटरकरिता परवानगी देण्यात आली आहे. या खासगी रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून रुग्णालयामध्ये जादा रक्कम घेतल्याचे तक्रारी प्राप्त होत आहेत़ कोरोनाबाधित रुग्णांकडून, नातेवाइकांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरिता या देयकांचे ऑडिट करणे आवश्यक असल्याने जिल्ह्यातील ६० खासगी कोविड रुग्णालयाकरिता एकूण १८ ऑडिटरची नेमणूक करण्यात आलेली आहे़ त्यांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
मान्यताप्राप्त डेडिकेटेड कोविड केअर सेंटरकरिता खासगी रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याकडून रुग्णालयामध्ये जादा रक्कम घेतल्याची तक्रार असल्यास किंवा देयकाबाबत काही शंका असल्यास संबंधित तालुक्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या ऑडिटर यांच्याशी तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.