ग्रामसेवा संस्थांवर प्रशासकांची नियुक्ती
By admin | Published: April 2, 2016 12:47 AM2016-04-02T00:47:06+5:302016-04-02T00:47:06+5:30
२४ संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती झाली असून, ७ ग्रामसेवा संस्थांवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरू.
संदीप गावंडे/वडनेर भोलजी (जि. बुलडाणा)
आर्थिक अडचणीत असलेल्या तालुक्यातील ग्रामसेवा व विविध कार्यकारी सह. संस्थांची संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे व निवडणुकीचा खर्च भरण्याची तयारी नसलेल्या २४ संस्थांवर प्रशासकाची नियुक्ती झाली असून, ७ ग्रामसेवा संस्थांवर प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरू आहे.
नांदुरा तालुक्यात एकूण ४९ ग्रामसेवा व विविध कार्यकारी संस्था असून, या संस्थांमार्फत शेतकर्यांना अर्जपुरवठा केला जात होता; परंतु सदर संस्थांना आधार देणारी जिल्हा सहकारी बँक बंद असल्याने या संस्था सध्या फक्त नावालाच अस्तित्वात आहेत. जिल्हा बँक बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी संस्थांना निवडणुकांकरिता भरावयाचा खर्चाचा भार उचलणे कठीण आहे, तसेच या संस्थांवर वर्चस्व असलेले सहकार नेतेही जिल्हा बँक बंद असल्यामुळे निवडणुकीला फारसे उत्साहित नाहीत. त्यामुळेच ३१ मार्च २0१६ पर्यंत मुदत संपलेल्या ३१ संस्थांपैकी २४ संस्थांवर प्रशासक नियुक्त झालेले असून माटोडा, कोलासर, खडदगाव, कंडारी, भिलवडी, वडाळी व खैरा या सात ग्रामसेवा संस्थांवर प्रशासक नियुक्तीची तयारी सुरू आहे.
एप्रिल महिन्यातही १४ संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपत असून, या संस्थांनाही निवडणूक खर्च न भरल्यास प्रशासक नेमण्यास तयार आहेत.
मुदत संपलेल्या संस्थांना २४ फेब्रुवारी १६ रोजी ७७ ए नोटीस काढून सहायक निबंधक यांनी संस्थांना म्हणणे मांडण्याची तसेच निवडणूक खर्च भरण्याची संधी दिली होती; परंतु संस्थांनी निवडणूक खर्च भरला नाही. त्यामुळे सहकार खात्याच्या सहायक निबंधक यांनी २९ फेब्रुवारी १६ रोजी संचालक मंडळ बरखास्त करीत अंतिम प्राधिकृत अधिकारी नियुक्ती आदेश काढले आहेत.