कंत्राटी पद्घतीवर होणार शंभर कामगारांची नियुक्ती!
By admin | Published: July 20, 2014 11:41 PM2014-07-20T23:41:48+5:302014-07-20T23:41:48+5:30
साफ सफाई आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शंभरपेक्षा जास्त सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे.
खामगाव: शहरातील साफ सफाई आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने शंभरपेक्षा जास्त सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावानुसार उद्या सोमवारी सकाळी साफसफाईसाठी सफाई कामगारांना बोलाविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठाही टप्प्या-टप्प्याने सुरळीत करण्यात येणार आहे. पालिकेतील प्रशासकीय कर्मचार्यांसह पाणी पुरवठा, अग्निशमन, दवाखाना आणि स्वच्छता विभागासारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. पालिका कर्मचार्यांच्या संपामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा प्रभावित होणार नाही, याची खबरदारी नगर पालिका प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात आहे. शहरातील स्वच्छतेची कामे प्रभावित होवू नये म्हणून कंत्राटी पद्धतीने सुमारे शंभरावर कर्मचार्यांना तात्पुरती नियुक्ती देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे पाणी पुरवठय़ासाठी शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शहरातील पाणी पुरवठा सुरूळीत करण्यासाठी शिकाऊ कर्मचारी धडपड करीत असल्याचे चित्र आज शहराच्या विविध भागात पहायला मिळाले. पाणी पुरवठय़ासाठी टप्प्या टप्प्याने नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आपल्या विविध न्याय मागण्यांसाठी १५ जुलै पासून पालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यानंतर १८ जुलै पासून अतिआवश्यक सेवेतील आणि सोमवार २१ जुलैपासून सफाई कामगार संपावर जाणार आहेत. नगर पालिका कर्मचारी व सेवानवृत्त कर्मचार्यांची सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी, कर्मचार्यांच्या वेतनासाठी शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, नगर पालिकेतील अनुकंपाधारकास तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देण्यात यावा, नगर पालिका कर्मचार्यांना कालबध्द पदोन्नती तात्काळ लागू करावी, कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेल्या कर्मचार्यांना व अपंग कर्मचार्यांना विशेष लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी नगर पालिका कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. सुमारे चारशेच्यावर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.