जामठी येथे ८.५० काेटींचे प्राथमिक आराेग्य केंद्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:00+5:302021-08-17T04:40:00+5:30
बुलडाणा : मासरुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जामठी येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून ८.५० कोटी ...
बुलडाणा : मासरुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जामठी येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून ८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिली आहे. त्यामुळे जामठीसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य समस्येची चिंता मिटणार आहे.
मासरूळ हे मोठे गाव असतानाही याठिकाणी आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. त्यामुळे कुटुंब नियोजन व अन्य शस्त्रक्रिया आणि आजारी नागरिकांना तालुका मुख्यालयी जावे लागत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कमल बुधवंत यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर वारंवार पाठपुरावा केला. या पाठपुराव्याचे फलित सकारात्मक स्वरूपात समोर आले असून जामठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी याविषयी शासन आदेश जारी केला आहे़ या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे जामठी (लोकसंख्या अंदाजे ४०००), शेकापूर (लोकसंख्या अंदाजे ४००), पांगरखेड (६००), सोयगाव(२०००), तराडखेड (४०००), मासरूळ (७५००), डोमरूळ ( २२००), टाकळी (६००), कुंबेफळ (२१००), वरूड (३२००), सातगाव ( ४५००), धामणगाव (लोकसंख्या अंदाजे ३५००) या बारा गावांतील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा परिसरात उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर एमबीबीएस अथवा समकक्ष दर्जाचे डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ सुद्धा प्रशासकीय इमारत उभी राहिल्यानंतर लगेच कार्यान्वित होणार असून, त्यांच्या निवासाची व्यवस्थादेखील याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात होणार आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री सुद्धा वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही़
मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
कोरोना महामारी व पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे आर्थिक संकटाचे मळभ दाटून आलेले असताना राज्यात विशेष बाब म्हणून केवळ जामठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले़ तसेच त्यासाठी निधी सुद्धा लगेच दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांचे आभार शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी मानले.