पुरातन मंदिराच्या अवशेषाची पुरातत्व विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:21+5:302021-06-01T04:26:21+5:30
मेहकर शहरालगत जानेफळ मार्गावर असलेल्या पैनगंगा नदीच्या अनिकटजवळील शेतात पुरातन मंदिराचे अवशेष सापडल्यामुळे त्याचे कुतूहल निर्माण झाले होते. ...
मेहकर शहरालगत जानेफळ मार्गावर असलेल्या पैनगंगा नदीच्या अनिकटजवळील शेतात पुरातन मंदिराचे अवशेष सापडल्यामुळे त्याचे कुतूहल निर्माण झाले होते. या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी नागपुरातील पुरातत्त्व विभागात छायाचित्रे पाठवून माहिती पाठवली होती व काम बंद ठेवण्यात आले होते. सोमवारी नागपूरच्या पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वहाने यांनी मेहकर येथे भेट दिली. सापडलेल्या पुरातन मंदिराच्या अवशेषांची पाहणी करून त्याची लेखी स्वरूपात नोंद घेतली. यावेळी आ. संजय रायमुलकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, माधव तायडे, ओमप्रकाश सौभागे, तहसीलदार डाॅ. संजय गरकल, मंडल अधिकारी रामराव चनखोरे, तलाठी माधव गायकवाड, लक्ष्मण सानप, सचिन दीक्षित आदी उपस्थित होते. यावेळी सापडलेल्या पुरातन मंदिराच्या अवशेषाची पाहणी करून याबाबत मुंबई कार्यालयाला सविस्तर प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यानंतरच पुढील शोधकार्य सुरू करण्यात येईल. मेहकर शहरातील कंचनीचा महाल, प्रताप टॉकीजजवळील घुमट, बालाजी मंदिर परिसराची पाहणी सहाय्यक संचालक जया वहाने व त्यांच्या चमूने केली आहे.
वास्तूंचे संरक्षण करणे महत्त्वाचे
मेहकर शहराला मोठा इतिहास आहे. शहराच्या अवतीभवती पुरातन वास्तू आहेत. या पुरातन वास्तूंची जपणूक करण्यासाठी प्राथमिक स्तरावर स्थानिक सामाजिक संस्थांनी, समाजकार्य करणाऱ्या नागरिकांनी समोर येऊन या वास्तूंचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
या प्रकरणाची पाहणी केली असून, याबाबतचा प्रस्ताव मुंबई कार्यालयाला पाठविणार आहे. त्या कार्यालयातून निर्देश प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
जया वहाने, सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, नागपूर