खामगाव एमआयडीसीतील क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय पुन्हा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 03:35 PM2019-08-27T15:35:00+5:302019-08-27T15:35:06+5:30
क्षेत्र व्यवस्थापक कार्यालयाचे कामकाज खामगावला सुरू नसल्यामुळे नवीन उद्योजक आणि जुने कारखाने सुरळीत करण्यासाठी नाहकचा त्रास उद्योजकांना होत आहे.
- गजानन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे क्षेत्र असलेली औद्योगिक वसाहत खामगाव येथे आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजकांसाठी येथे क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु हे कार्यालय अनेक महिन्यांपासून बंद दिसत आहे. त्यामुळे उद्योजकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
खामगाव येथे सन २०१८ ला ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सुरू करण्यात आले होते. परंतु काही दिवसांनंतर लगेच येथील क्षेत्र व्यवस्थापक राजेश ठाकरे आणि वरिष्ठ लिपीक संतोष बोंडे यांना अमरावती कार्यालयात हलविण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चिखली, मलकापूर, खामगाव येथील कारखानदारांना छोट्या-छोट्या कामांसाठीसुध्दा अमरावतीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून ताबडतोब क्षेत्र व्यवस्थापक कार्यालय सुरू करावे, अशी मागणी एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
मागील वर्षी उन्हाळ्यामध्ये एमआयडीसीला पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने परिसरातील धरणे तुडूंब भरल्याने एमआयडीसीला २४ तास पाणी पुरवठा करण्यात येत आहे. परंतु क्षेत्र व्यवस्थापक कार्यालयाचे कामकाज खामगावला सुरू नसल्यामुळे नवीन उद्योजक आणि जुने कारखाने सुरळीत करण्यासाठी नाहकचा त्रास उद्योजकांना होत आहे.