देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ
By सदानंद सिरसाट | Updated: October 29, 2023 15:45 IST2023-10-29T15:45:12+5:302023-10-29T15:45:29+5:30
याप्रकरणी लालबाबा देवी मंदिर परिसराची जागा मालकी असलेले सतीश नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

देवीचा मुकुट बसविण्याचा वाद, घरात घुसून मारहाण; मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जागा मालकाला शिवीगाळ
खामगाव (बुलढाणा) : शेगाव शहरातील अकोट रोडवरील लालबाबा देवीच्या मंदिरात चोरी झाल्यानंतर त्याठिकाणी देवीचा मुकुट बसविण्याबाबत वाद घालत लालबाबा मंदिर जागा मालकाच्या घरात घुसून मारहाण करणे, तसेच तक्रार देण्यास गेले असता, रस्त्यात अडवून पुन्हा मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगावातील आरोपी गजानन नाईकवाडे, प्रमोद सुळ यांच्यासह ८ ते १० अनोळखी आरोपींवर पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी लालबाबा देवी मंदिर परिसराची जागा मालकी असलेले सतीश नंदकिशोर मुरारका यांनी शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये अकोट रोडवर त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये लालबाबा देवी मंदिर आहे. शुक्रवारी रात्री अज्ञाताने मंदिरामधील देवीचा मुकुट तसेच इतर सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. त्याबाबतचा गुन्हा पोलिसात दाखल आहे. त्यानंतर सतीश कचरे याने मुरारका यांना फोन करून देवीचा मुकुट बसवायचा आहे, असे म्हटले. त्यावर मुरारका यांनी ते काम त्यांचे भाऊ पाहतात, असे सांगितले. त्यानंतर आरोपी गजानन नाईकवाडे, प्रमोद सुळ यांच्यासह आठ ते दहा आरोपींनी मुरारका यांच्या घरात घुसून लालबाबा देवीचा मुकुट कसे काय बसवू देत नाही, असे म्हणून काठीने व लोखंडी बकेट डोक्यात मारून जखमी केले. घरातील विद्युत मीटरचे तसेच इतर सामानाची तोडफोड करून नुकसान केले. त्यावेळी तक्रार देण्यासाठी ते निघाले असता, दुचाकी अडवून दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. मुरारका यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ४५२, ३२४, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ३२७, ४२७, ३४१, ५०१, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कुणाल जाधव करत आहेत.
- मंदिरात प्रवेश नाकारल्याची तक्रार
शनिवारी सकाळी लालबाबा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता, त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार ज्योती अमोल तायडे या विवाहितेने केली. त्यावरून लालबाबा देवी मंदिर जागेचा मालक सतीश नंदकिशोर मुरारका याच्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्योती तायडे हिने पोलिसात तक्रार दिली. त्यामध्ये सकाळी दिरासह देवीच्या मंदिरात गेली असता, हा प्रकार घडल्याचे म्हटले. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे करत आहेत.