‘श्रीं’च्या विसर्जनाची व्यवस्था मंडळांकडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:28 AM2020-08-26T11:28:43+5:302020-08-26T11:29:09+5:30

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणूक काढणार नसल्याचे पत्र दिले आहे.

The arrangements for the immersion of 'Shree' are with the Mandals! | ‘श्रीं’च्या विसर्जनाची व्यवस्था मंडळांकडेच!

‘श्रीं’च्या विसर्जनाची व्यवस्था मंडळांकडेच!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विघ्नंहर्त्याच्या उत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अनेक मंडळांकडून गणशोत्सव अतिशय साध्यापध्दतीने साजरा करण्यात येत आहे. श्रींच्या स्थापनेपूर्वीच खामगाव शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन मिरवणूक काढणार नसल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत आलेल्या गणशोत्सव काळात खामगाव शहरातील गणेशोत्सवाची माहिती घेण्यासाठी अमरावती विभागीय विशेष पोलिस महानिरिक्षक मकरंद रानडे यांनी सोमवारी रात्री खामगावात भेट दिली. शहर पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनिल अंबुलकर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील हुड, रफीक शेख उपस्थित होते.
दरम्यान, २१ जुलै रोजीच्या शांतता समितीच्या बैठकीत गणेश विसर्जन मिरवणुका न काढण्याबाबतही चर्चा झाली होती. त्यानुषंगाने कौटुंबिकस्तरावरच श्रींचे विसर्जन घरातच केले जावे असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे नदी, तलावावर विसर्जन घाट बनविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. जेथे प्रसंगी अडचण आहे अशा ठिकाणी जिल्ह्यात कृत्रीम तलावात स्थानिक पातळीवर विसर्जन करता येणार आहे. दुसरीकडे यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या वतीने गणेश मंडळांनाही आवाहन करण्यात आलेले आहे. घरगुती गणेशाचे विसर्जनही घरीच होईल.


विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही!
कोरोना विषाणू संसर्ग आणि सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता समितीच्या सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये काही अटींवरच जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेशाची स्थापना करण्याची परवानगी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने विसर्जनासोबतच इतरही मुद्याचा समावेश आहे. यासंदर्भात काही गणेशोत्सव मंडळांनी मिरवणूक काढणार नसल्याचे पत्र पोलिस प्रशासनाला दिले आहे.


खामगाव व परिसरात ८६ गणेश मंडळे!
जिल्ह्यात एक हजारावर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. खामगाव शहरात प्रमुख १७ गणेश मंडळ आहेत. यामध्ये परिसरातील आणखी ८ मंडळांचा समावेश आहे. शिवाजी नगर, ग्रामीण पोलिस स्टेशनतंर्गत सुमारे १०० पेक्षा गणेश मंडळे आहेत. यापैकी बहुतांश मंडळांनी पोलिसांना साधेपणाने तसेच विसर्जन मिरवणूक काढणार नसल्याचे पत्र दिले आहे. यामध्ये स्वत:च विसर्जनाची व्यवस्था करणार असल्याचेही नमूद आहे.


घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच!
खामगाव शहर आणि परिसरात घरोघरी बसविण्यात आलेल्या श्री गणेशाचे घरीच विसर्जन करण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावर तसेच परिसरात चोख पोलिस ंबंदोबस्त लावण्यात येणार आहे.

Web Title: The arrangements for the immersion of 'Shree' are with the Mandals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.