लाच म्हणून दारू व मटणाची पार्टी घेणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:27 AM2021-05-30T04:27:12+5:302021-05-30T04:27:12+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण नामक व्यक्तीच्या शेतातील झोपडीसमोर ही कारवाई केली. या कारवाईत लाखनवाडा येथील मंडल अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबूराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे.
खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाणे येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने त्याच्या भावाच्या नावाने प्लॉट घेतला होता. त्याची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथील मंडल अधिकारी विलास साहेबराव खेडेकर आणि तलाठी बाबूराव उखर्डा मोरे यांनी दहा हजार रुपयांची लाच आणि मद्य व मटणाची पार्टी मागितली होती. यातील दहा हजार रुपये यापूर्वी उपरोक्त दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. मटणाच्या पार्टीसाठी तेवढा आरोपींचा आग्रह सुरू होता. याप्रकरणी त्रस्त झालेल्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या आधारावर सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडल अधिकारी व तलाठ्यास अटक केली.
एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, पोलीस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान, विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, नितीन शेटे, शेख अर्शद यांच्या पथकाने ही कारवाई केली.
--ताव मारत असतानाच अटक--
२८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान तक्रारदाराकडून खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर दारू व मटणाची पार्टी सुरू असतानाच एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. सोबतच मद्याच्या दोन बाटल्याही जप्त केल्या. कारवाईदरम्यान नाशवंत पदार्थ तेथेच पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. म्हणजे ज्यावर आरोपी ताव मारत होते ते खाद्यपदार्थही एसीबीने तेथे नष्ट केले.