श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ भजनी दिंड्यांचे आगमन; टाळ-मृदंगाचा गजर
By सदानंद सिरसाट | Published: September 16, 2023 06:56 PM2023-09-16T18:56:40+5:302023-09-16T18:56:57+5:30
श्री गजानन महाराज संस्थानमध्ये भक्तांची वाढती गर्दी नियंत्रण करण्यासाठी व सतत जाण्या-येण्यासाठीच्या मार्गात सोयीनुसार बदल करावे लागतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव (बुलढाणा) : श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी १० वाजता ब्रह्मवृंदाच्या हस्ते विधिवत पूजन करून मंत्रोपचारात श्री गणेश याग व वरुण यागास आरंभ करण्यात आला. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाचे निमित्ताने संतनगरीत गावोगावीच्या भजनी दिंड्यांचे आगमन होत असून, जिकडेतिकडे भगवे पताकाधारी वारकरी व टाळ-मृदंगाचा गजर ऐकावयास मिळत आहे.
श्री संस्थानात काकड, आरती, भजन, प्रवचन व कीर्तन महाप्रसाद हे कार्यक्रम नित्यक्रमाने सुरू आहेत. तसेच श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने १६ सप्टेंबरपासून श्री गणेश याग व श्री वरुण यागाला सुरुवात झाली. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती होणार आहे.
या उत्सवानिमित्त १६ सप्टेंबरपासून दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होत आहे. यात शनिवारी हभप सुनील शिंगणे देऊळगाव मही यांचे कीर्तन झाले. तसेच १७ सप्टेंबर रोजी अनिरुद्ध महाराज क्षीरसागर सावरगाव, १८ रोजी गणेश महाराज हुंबड महागाव, १९ रोजी पंडित बुवा क्षीरसागर आळंदी, २० रोजी भारत बुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. त्याच दिवशी सकाळी श्रींच्या समाधी सोहळ्यावर कीर्तन होईल. सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व दुपारी श्रींची पालखी परिक्रमा निघणार आहे. २१ रोजी श्रीधरबुवा आवारे यांचे सकाळी ६ वाजता काल्याच्या कीर्तनाने पुण्यतिथी उत्सवाची सांगता होईल.
दिंड्या व मिरवणुकांसाठी १२ मीटरचा नवा मार्ग
श्री गजानन महाराज संस्थानमध्ये भक्तांची वाढती गर्दी नियंत्रण करण्यासाठी व सतत जाण्या-येण्यासाठीच्या मार्गात सोयीनुसार बदल करावे लागतात. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाने १२ मीटर रुंदीचा नवीन रस्ता तयार करून वाहतुकीस मोकळा करून दिला आहे. यंदाच्या श्रींच्या समाधी सोहळ्यापासून सर्वच उत्सवानिमित्त येणाऱ्या भजनी दिंड्या, तसेच गावातील शोभायात्रा, मिरवणुका आता याच मार्गाने येतील व पुढे दक्षिण प्रवेशद्वारातून बाहेर निघतील. यासाठी शहरवासीयांसह सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले.