अरुण दातेंचे झब्बे अन् बुलडाणा यांचे अनोखे नाते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:15 AM2018-05-07T04:15:42+5:302018-05-07T04:15:42+5:30
भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह बुलडाणेकरांसाठीही धक्का देणारी घटना ठरली आणि पुन्हा ५० झब्ब्यांचा किस्सा बुलडाणेकरांना स्मरला.
बुलडाणा : भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह बुलडाणेकरांसाठीही धक्का देणारी घटना ठरली आणि पुन्हा ५० झब्ब्यांचा किस्सा बुलडाणेकरांना स्मरला.
तब्बल २९ वर्षांच्या अनोख्या मैत्रीचा हा किस्सा आहे. या मैत्रीमुळे बुलडाणा आणि अरुण दातेंचे एक अजोड असे नाते बनले होते. अरुण दातेंची ही मैत्री होती बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी. या दोघांची नावे जेव्हा समोर येतात, तेव्हा ५० झब्ब्यांची गोष्ट आवर्जून बुलडाण्यासह संगीत रसिकांना आठवते. अरुण दातेंच्या जाण्याचे बुलडाणेकरांच्या डोळ्यासमोरही २९ वर्षांच्या या एका कौटुंबिक संबंधांचा चित्रपट झर्रकन डोळ्यासमोरून गेला. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनीही त्याची तशी कबुलीच दिली.
अरुण दातेंच्या ज्या मैफलीला हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असतील, त्या मैफलीसाठी अरुण दातेंनी परिधान केलेला अंगातील झब्बा हा खिशातील पैशांसह हर्षवर्धन सपकाळांना भेट दिल्या जात होता.
प्रत्येक मैफलीत अरुण दातेंनी हा किस्सा उपस्थित रसिकांनासुद्धा सांगितलेला आहे. आजपर्यंत कमी-अधिक ५० झब्बे अरुण दातेंकडून हर्षवर्धन सपकाळांना भेट मिळालेले आहेत.
अरुण दाते यांनी तब्बल सहा दशके एकहाती भावगीताचे वैभव प्रत्येक मराठी माणसाच्या घरापर्यंत व मनापर्यंत पोहोचवत अभिजात मराठी माय-माउलीची केलेली सेवा अतुलनीय असून, भावविश्वाची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याची भावना अरुण दातेंच्या निधनाच्या पृष्ठभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
१९९० मध्ये सुरू झब्ब्यांचा किस्सा
बुलडाणा शहरात १९९० मध्ये जय मातृभूमी क्रीडा मंडळाने अरुण दातेंच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डीमध्ये ‘पंखा’ म्हणून ओळख असलेल्या जय मातृभूमीचे खेळाडू आणि आताचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यावेळी अरुण दातेंना आॅटोग्राफ न मागता त्यांचा शर्ट मागितला होता आणि अरुण दातेंनी तो मोठ्या मनाने त्यांना दिला. तेव्हापासून ते अगदी गेल्या वर्षाअखेरीस कुरियरने अरुण दातेंनी हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचे तीन झब्बे पाठवले होते.