बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून एकाच दिवशी तब्बल ७९ जुगार अड्यावर धाडी
By अनिल गवई | Published: May 9, 2023 01:21 PM2023-05-09T13:21:18+5:302023-05-09T13:21:32+5:30
दारूबंदीच्या ९८ केसेस: अवैध दारू विक्रेत्यांच्याही आवळल्या मुसक्या
खामगाव - जिल्हा पोलीसांनी उपविभागातील ठिकठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाडी घालून एकाच दिवशी तब्बल ७९ गुन्हे दाखल केले. यात ८५ पेक्षा अधिक आरोपींना अटक करण्यात आल्याचे समजते. त्यांच्याकडून जुगारात खेळल्या जाणार्या हजारो रूपयांसह अनेक मोबाईल सेट आणि जुगार खेळण्याचे इतर साहित्य जप्त करण्यात आले. त्याचवेळी अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी एकाचवेळी तब्बल ९८ कारवाई करण्यात आल्या. यात ९१ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अवैध जुगार तसेच दारूविक्रीला आळा घालण्यासाठी बुलडाणा जिल्हा पोलीस दलाकडून धडक मोहिम राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील सर्वच पोलीस उपविभागातील अवैध जुगार अड्डे तसेच दारू िवक्रीची केंद्रे उध्वस्त करण्यात आलीत. प्रभारी पोलीस अधिक्षक तथा खामगाव येथील उपविभागीय अधिकारी अशोक थोरात यांच्या नेतृत्वात हीधडकमोहिम राबिवण्यात आली. या मोहिमेत बुलढाणा उपविभागातील सर्वाधिक २५ जुगार तर ३३ दारूविक्रीच्या कारवाई करण्यात आल्या. त्यानंतर मलकापूर उपविभागात जुगार आणि दारू विक्रीच्या प्रत्येकी २० कारवाई करण्यात आल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून समोर येत आहे.
आतापर्यंतची सर्वात मोठी धडक मोहिम
एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत मोठ्याप्रमाणात आरोपी अटक करण्यात आले. त्याचवेळी मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात राबविण्यात आलेली ही सर्वात मोठी मोहिम असल्याची चर्चा आहे. या मोहिमेमुळे अवैध जुगार व्यावसायिकांसोबतच दारू िवक्रेत्यांमध्येहीचांगलीच खळबळ माजली आहे.
धडक मोहिमेत अशी झाली कारवाई
बुलढाणा २५
मेहकर १६
मलकापूर २०
खामगाव ११
देऊळगाव राजा ०७
एकुण ७९
दारू विक्री करणाऱ्यांच्याही आवळल्या मुसक्या
बुलढाणा ३३
मेहकर १९
मलकापूर २०
खामगाव १२
देऊळगाव राजा १२
एकुण ९६
अवैध धंद्यांना आळा घालण्यासोबतच दारू िवक्रीलाही पायबंद घालण्यासाठी बुलडाणा पोलीस दलाकडून शनिवारी संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील ७९ जुगार अड्यांवर धाडी टाकण्यात आल्या. त्याचवेळी ९६ दारू बंदीच्या कारवाई करण्यात आल्या. या कारवाईमुळे दारूविक्री सोबतच जुगाराला पायबंद घालण्यास निश्चितच मदत होईल. - अशोक थोरात, अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलढाणा.